Latest

आता घरबसल्या करता येणार स्पीडपोस्ट पार्सल बुक !

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  टपाल कार्यालयाने डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले असून, नागरिकांना आता घरबसल्या 'स्पीड पोस्ट आणि पार्सल' बुक करता येणार आहे. बुक करण्यात आलेल्या वस्तू पिकअप करण्यासाठी स्वत: पोस्टमन घरी येणार आहेत. यासाठी नागरिकांना ऑनलाइन पेमेंट करावे लागणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना टपाल कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. या सुविधेला 'क्लिक अँड बुक' या नावाने संबोधण्यात आले आहे. देशात सर्वच क्षेत्रात तांत्रिक बदल होत आहेत. त्याच अनुषंगाने टपाल कार्यालयेदेखील बदलू लागली आहेत.

त्यांचाही प्रवास आता डिजिटलच्या दिशेने सुरू होऊ लागला आहे. त्यानुसार टपाल विभागाने नागरिकांना घरबसल्या स्पीड पोस्ट किंवा पार्सल बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्पीड पोस्ट किंवा पार्सल पाठविण्यासाठी नागरिकांना टपाल विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागणार आहे. या संकेतस्थळावर आपले नाव व इतर माहिती एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर कितीही वेळा या सुविधेचा लाभ घेता येतो. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा पुणे सिटी पोस्ट (पिन कोड 411002),पुणे हेड पोस्ट ऑफिस (जी पी ओ: पिन कोड 411001), एस. पी. कॉलेज पोस्ट ऑफिस (पिन कोड 411030), शिवाजीनगर पोस्ट ऑफिस (पिन कोड 411005) या कार्यालयात सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, संकेतथळावर नावनोंदणी केल्यानंतर 5 किलोपर्यंतचे स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट अगर पार्सल बुकिंग करू शकतात. त्यासाठी 500 रुपयांच्या आसपास पोस्टेज खर्च येणार असून, 50 रुपये पोस्ट खर्च वेगळा आकारण्यात येणार आहे. दरम्यान, पोस्टेज 500 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर कोणताही चार्ज घेण्यात येणार नाही. पार्सल अगर स्पीड पोस्ट पिक करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या सोयीने  वेळ निवडता येईल, असे आवाहन टपाल विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT