Latest

बनावट नोंदणी प्रकरणांचे उच्चाटन GST विभागाची विशेष मोहीम

Arun Patil

केंद्रीय आणि राज्य कर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अलीकडेच झालेल्या समन्वय बैठकीत, दुसर्‍यांच्या नावे बनावट GST नोंदणी करून त्याचा गैरवापर करणार्‍या व्यक्तीवर कारवाई करण्याबाबत चर्चा होऊन मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार, देशातील सर्व केंद्रीय आणि राज्य कर विभागाकडून दि. 16 मे ते 15 जुलै 2023, या चालू दोन महिन्यांमध्ये बनावट GST नोंदणी प्रकरणांचे उच्चाटन करण्यासाठी खास मोहीम राबविण्यात येत आहे.

GST कायद्याअंतर्गत आतापर्यंत देशामध्ये एकूण 1.39 कोटी नोंदणीपत्रे घेतली गेली आहेत, त्यामध्ये काही व्यक्ती/व्यापार्‍यांकडून दुसर्‍यांच्या माहितीच्या आधारे बनावट GST नोंदणी करून प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू वा सेवेचा पुरवठा न करता खोटी बिले काढून समोरच्या खरेदीदाराला चुकीचे ITC उपलब्ध करून दिल्याच्या घटना समोर येत आहेत.

सदर मोहिमेअंतर्गत करदात्यांची इतर कसलीही चौकशी न करता, त्यांच्या चालू नोंदणीपत्रांची केवळ पडताळणी केली जाणार असल्याने प्रामाणिक करदात्यांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. बनावट नोंदणीपत्रे घेऊन, खोटी बिले तयार करून त्यामार्गे चुकीचे ITC उपलब्ध करून देऊन सरकारी महसुलाला गळती लावणार्‍यांना शोधून काढणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या संदर्भात कोणीही कर अधिकार्‍याने आपल्याकडे काही माहिती अथवा कागदपत्रांची मागणी केल्यास त्याची करदात्याकडून त्वरित पूर्तता होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर खाली नमूद केलेल्या काही गोष्टींची स्वतःहून पूर्तता केल्यास कर प्रशासनास नक्कीच मदत होईल.

1. ज्या जागेतून आपण आपला धंदा/व्यवसाय करतो, त्या ठिकाणी आपला GST नोंदणी क्रमांक आणि नोंदणीपत्रात जसे नमूद केले आहे तसे आपले व्यापारी/व्यावसायिक नाव स्पष्ट दिसेल असे दर्शवावे.

2. धंद्याची जागा जर भाडेतत्त्वावर घेतली असेल आणि त्याची मुदत संपली असेल, तर भाडे करारपत्र आणि GST नोंदणीपत्र घेत असताना सादर केलेल्या कागदपत्रांचे आद्यपण(रिन्यू) करणे गरजेचे आहे.

3. धंद्याच्या जागेची मालकी बदलली असल्यास कागदपत्रात तशी दुरुस्ती किंवा पूर्वीच्या मालकाचे ना हरकतपत्र घेऊन आपल्या वीज बिलातही दुरुस्ती करून घ्यावी.

4. धंदा-भागीदारीत असलेस सर्व भागीदारांना/संचालकांना जाणून घेणारे (KYC) कागदपत्रे तयार ठेवावीत.

5. आपल्या सर्व पुरवठादारांची लागणारी जरूर ती माहिती आणि त्यांना वेळोवेळी अदा केलेल्या रकमांचा पडताळा करावा तसेच आपण खर्‍या आणि योग्य पुरवठादाराकडूनच वस्तू वा सेवांची खरेदी करतो याची खात्री करावी.

6. GST कायद्याअंतर्गत विहित केलेल्या लेखापुस्तकातील नोंदी आणि आपल्या खरेदी-विक्रीसंबंधीच्या सर्व व्यवहारांच्या नोंदी ठेवण्याबरोबरच आपली विवरणपत्रे वेळेवर भरणे गरजेचे आहे.

7. कर अधिकार्‍यांनी आपल्या ठिकाणी भेट दिल्यास लागणार्‍या माहितीची आणि कागदपत्रांची त्वरित पूर्तता करावी जेणेकरून पुढची नोटीस येणार नाही.

8. या मोहिमेत वरीलप्रमाणे आपण सहकार्य न केल्यास GST कायद्यातील तरतुदीनुसार आपणाला दंड होऊ शकतो, आपली GST नोंदणी रद्द होऊ शकते, आपले ITC स्थगित केले जाऊ शकते आणि चुकीच्या मार्गाने ITC मिळविले असेल तर पुढील कारवाई होणारच.

सरकारच्या या देशव्यापी मोहिमेचे सर्व प्रामाणिक आणि जबाबदार करदाते स्वागत करतील आणि खोटा धंदा करून सरकारी महसूल बुडविणार्‍या प्रतिस्पर्ध्यांना लगाम लावण्यास कर प्रशासनाला सहकार्य करतील, अशी अशा आहे.

शिरीष कुंदे,
केंद्रीय अप्रत्यक्ष कर विभागाचे निवृत्त सनदी अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT