Latest

नेवासा : विशेष लेखापरीक्षक लाचेच्या जाळ्यात; एक लाख स्वीकारताना पकडले

अमृता चौगुले

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी तीन लाखांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी एक लाखाची रक्कम स्वीकारताना विशेष लेखापरीक्षक आणि खासगी लेखापरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 20) रंगेहाथ पकडले. नेवासा फाटा येथे लावलेल्या सापळ्यात दोघांना पकडण्यात आले.

जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील विशेष लेखापरीक्षक किसन दिंगबर सागर (रा. छत्रपती संभाजीनगर) आणि खासगी लेखापरीक्षक तय्यब वजीर पठाण (रा. जवळे खुर्द, ता. नेवासा) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. पतसंस्थेचे लेखापरीक्षण करून चांगला अहवाल तयार करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

संबंधित पतसंस्थेच्या अध्यक्षांनीच ही तक्रार दिली होती. पतसंस्थेचे लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी लेखापरीक्षकांना दिले होते. लेखापरीक्षक किसन सागर याने तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दर्शविण्यासाठी आणि लेखापरीक्षण अहवाल चांगला सादर करण्यासाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपीने तडजोडीअंती दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयाची रक्कम नेवासा फाटा येथे स्वीकारताना दोन्ही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरुन शेख, दशरथ लाड यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT