मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बिपरजॉय चक्रीवादळाने आपला रस्ता गुजरातकडे वळविला असला, तरी महाराष्ट्रातील पावसाला मात्र ब्रेक लागला आहे. कृषी खात्याच्या ताज्या अहवालानुसार, राज्यात केवळ 8.8 टक्के पाऊस झाला आहे. परिणामी, खरीप हंगामाच्या पेरण्याही रखडल्या आहेत. सरासरी अवघ्या एक टक्का शेतजमिनीवर पेरण्या झाल्या आहेत. त्यातच पुढील चार आठवडे अत्यल्प आणि तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाने राज्यातील हवामान, उन्हाळी हंगामाची अंतिम पीक परिस्थिती आणि खरीप हंगामाच्या तयारीबाबत राज्य मंत्रिमंडळासमोर सादरीकरण केले. विभागाच्या या साप्ताहिक अहवालानुसार, राज्यात 9 जूनपर्यंत केवळ 5.5 मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या 62.3 मि.मी. इतका म्हणजेच 8.8 टक्के आहे. या कालावधीत राज्याच्या बहुतांश विभागांत आकाश कोरडे, निरभ्र होते. कोकण, अमरावती विभागांत तुरळक हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची नोंद झाली आहे. अशीच स्थिती नाशिक, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर विभागांत आहे; तर लातूर, नागपूर विभागांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे.
तुरळक पावसाचा फटका खरीप हंगामाच्या पेरणीला बसला आहे. राज्यात उसासह खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र 152.97 लाख हेक्टर इतके आहे. त्यापैकी केवळ 0.77 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच फक्त 1 टक्का क्षेत्रावर पेरणी झाल्याचे नमूद केले आहे.