Latest

IND vs SA 2nd Test : केपटाऊन कसोटीच्या पहिल्याच दिवशी 23 विकेट पडल्या, भारताची स्थिती मजबूत

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA 2nd Test : केपटाऊन कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 62 अशी झाली आहे. एडन मार्कराम 36 आणि डेव्हिड बेडिंगहॅम सात धावांसह खेळत आहे. भारताकडे अजूनही 36 धावांची आघाडी असून दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात सात विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या डावात भारताकडून मुकेश कुमारने दोन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. डीन एल्गर 12 धावा करून बाद झाला. टोनी जॉर्जी आणि ट्रिस्टन स्टब्स प्रत्येकी एक धाव काढून बाद झाले.

भारताचा पहिला डाव 153 धावांवर आटोपला. भारताने शेवटच्या सहा विकेट्स एकही धाव न करता गमावल्या. एकवेळ भारताची धावसंख्या 4 बाद 153 होती. विराट कोहली आणि लोकेश राहुल फलंदाजी करत होते. मात्र, राहुल बाद झाल्यानंतर शेवटच्या फळीतील फलंदाजांनी मैदानावर केवळ हजेरी लावली आणि ते माघारी परतले. भारताचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने 39 धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने 36 आणि विराट कोहलीने सर्वाधिक 46 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुलला खाते उघडता आले. त्याने आठ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार (नाबाद) यांना खाते उघडता आले नाही.

भारताने 11 चेंडूत 6 विकेट गमावल्या

भारताने शेवटच्या 6 विकेट एकही धाव न करता गमावल्या. 153 च्या स्कोअरवर टीमने 4 विकेट गमावल्या होत्या, या स्कोअरवर टीम ऑलआऊट झाली होती. 34व्या षटकातील पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर संघाने विकेट गमावल्या. त्यानंतर 35व्या षटकातही भारताने दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट गमावल्या. लुंगी एनगिडीने 34व्या षटकात तीन, तर कागिसो रबाडाने 35व्या षटकात 2 बळी घेण्याची किमया केली. यादरम्यान मोहम्मद सिराज धावबाद झाला.

दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्जर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला. मात्र, पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 98 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे. खेळपट्टीचे स्वरूप पाहता भारतीय संघ सामन्यात पुढे आहे. आता या मोसमात दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारतीय गोलंदाज हा सामना डावाच्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करतील. खेळपट्टीचा विचार करता भारतासाठी 50 हून अधिक धावांचे लक्ष्य अवघड असू शकते.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळली जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने दमदार गोलंदाजी करत यजमान संघाला स्वस्तात बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव उपाहारापूर्वी 23.2 षटकांत 55 धावांत आटोपला. भारताविरुद्धच्या कसोटीतील कोणत्याही संघाची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 9 षटकात 15 धावा देत 6 बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. द. आफ्रिकेकडून काईल वेरेनेने सर्वाधिक 15 धावा केल्या. डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले.

श्रेयस खाते न उघडताच बाद

श्रेयस अय्यर खाते न उघडताच बाद झाला. त्याने फक्त दोन चेंडूंचा सामना केला. नांद्रे बर्जरने त्याला यष्टिरक्षक वेरेनेकरवी झेलबाद केले.

भारताची तिसरी विकेट

भारताची तिसरी विकेट 105 धावांवर पडली. शुभमन गिल 36 धावा करून बाद झाला. नांद्रे बर्जरने त्याला मार्को जॅनसेनकरवी झेलबाद केले.

भारताची दुसरी विकेट

भारताची दुसरी विकेट 72 धावांवर पडली. कर्णधार रोहित शर्मा 39 धावा करून बाद झाला. नांद्रे बर्जरने त्याला मार्को जॅनसेनकरवी झेलबाद केले.

भारताची पहिल्या डावात आघाडी (IND vs SA 2nd Test)

भारतीय संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. रोहित शर्माने वेगवान धावा केल्या आणि भारतीय संघाला चांगल्या स्थितीत आणले. यादरम्यान त्याने शुभमन गिल सोबत अर्धशतकी भागीदारी रचली. यासह भारतीय संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी आहे.

यशस्वी शुन्यावर बाद

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालची बॅट चालली नाही. तो खाते न उघडताच बाद झाला. त्याने सात चेंडूंचा सामना केला. त्याला कागिसो रबाडाने क्लीन बोल्ड केले.

द. आफ्रिका 55 धावांत गारद

यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर गारद झाला. पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी केपटाऊन कसोटीत अप्रतिम मारा केला. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल वेरनेने 15 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्कराम (2), डीन एल्गर (4), टोनी डी जॉर्जी (2), ट्रिस्टन स्टब्स (3), मार्को जॅनसेन (0), केशव महाराज (1), कागिसो रबाडा (2), नांद्रे बर्जर (4) हे आले तसे तंबूत परतले.

SCROLL FOR NEXT