Latest

SA vs IND Test Day 3 : भारताचा 1 डाव 32 धावांनी पराभव, द. आफ्रिकेची मालिकेत आघाडी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सेंच्युरियनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 32 धावांनी गमावला. गुरुवारी (28 डिसेंबर) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात 131 धावांवर ऑलआऊट झाली. विराट कोहलीने अर्धशतक केले, बाकीचे फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने 4 बळी घेतले.

मंगळवारी सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा केल्या आणि 163 धावांची आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात केवळ 131 धावा करता आल्या.

पहिल्या कसोटीतील विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारी 2024 पासून केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. भारताला आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकता आलेली नाही. पहिल्या कसोटीतील पराभवामुळे टीम इंडिया या दौऱ्यातही मालिका विजयाशिवाय मायदेशी परतणार हे निश्चित झाले आहे.

एल्गर सामनावीर

दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या डावात 185 धावा करणारा डीन एल्गर सामनावीर ठरला. तो त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 3 बळी घेतले. तर पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या नांद्रे बर्जरने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या.

तिसऱ्या सत्रात भारत सर्वबाद

भारताने तिसऱ्या सत्राची सुरुवात 3 बाद 60 या स्कोअरने केली. श्रेयस अय्यर 6, केएल राहुल 4, सिराज 4 आणि शार्दुल ठाकूर अवघ्या 2 धावा करून बाद झाले. रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांना खातेही उघडता आले नाही. विराट कोहलीने एक टोक सांभाळले. त्याने 30 वे कसोटी अर्धशतक झळकावले पण तो संघाला डावाच्या पराभवापासून वाचवू शकला नाही. कोहलीने 76 धावांची खेळी खेळली. या सत्रात टीम इंडियाने 71 धावा करताना शेवटच्या 7 विकेट गमावल्या. यासह संघाला एक डाव आणि 32 धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी 2024 पासून केपटाऊनच्या मैदानावर खेळवला जाईल.

विराटचे 30 वे कसोटी अर्धशतक

दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खूपच खराब झाली, सलामीवीर 13 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. क्रीजवर आल्यानंतर विराट कोहली शेवटपर्यंत टिकून राहिला, त्याने 82 चेंडूत 76 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

SCROLL FOR NEXT