Latest

Sourav Ganguly : टी-20 वर्ल्डकपसाठी कोहलीला सलामीवीर म्हणून प्राधान्य द्यावे : सौरव गांगुली

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा आणि यशवी जैस्वाल हे टीम इंडियासाठी सलामी देणार आहेत. पण भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सलामीच्या जोडीबाबत दुसरा पर्याय सुचवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संघ व्यवस्थापनाने सलामीवीर म्हणून विराट कोहलीला प्राधान्य देऊन त्याच्या जोडीला रोहित किंवा जैस्वालला मैदानात पाठवावे, असे स्पष्ट मत गांगुली यांनी व्यक्त केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

  • टी-20 विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने डावाची सुरुवात करावी
  • तो टीम इंडियाला उत्तम सुरुवात करून देईल
  • संघ व्यवस्थापनाने सलामीवीर म्हणून कोहलीला प्राधान्य द्यावे
  • त्याच्या जोडीला रोहित किंवा जैस्वाल यांना मैदानात पाठवावे

गांगुली (Sourav Ganguly) पुढे म्हणाले, 'विराट कोहली अतिशय शानदार फॉर्ममध्ये आहे. आरसीबीचा सलामीवीर म्हणून त्याची फलंदाजी डोळ्याचे पारणे फेडणारी अशीच राहिली आहे. तो आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने 13 सामन्यात 66.10 च्या सरासरीने आणि 155.16 च्या स्ट्राईक रेटने 661 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीच्या खेळीमुळेच आरसीबीला खराब सुरुवातीनंतर जबरदस्त कमबॅक करण्यात यश आले आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यातील त्याची 90 धावांची झटपट खेळी पाहता तो टी-20 विश्वचषकात भारतासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून उत्तम सुरुवात करून देईल असा मला विश्वास आहे.'

'निवड समीतीने टी-20 विश्वचषकासाठी संतुलित संघ निवडला आहे, ज्यात चॅम्पियन होण्याची क्षमता आहे. पण संघ व्यवस्थापनाने सलामीच्या जोडीत बदल करावा आणि नवे फॉर्मेशन तयार करावे. कोहलीसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित किंवा जैस्वाल यांना पाठवावे. ज्यामुळे सुरुवातीपासूनच विरोधी संघाच्या गोलंदाजांवर दडपण येईल,' असेही गांगुली (Sourav Ganguly) यांनी सांगितले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांनीही भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात सलामीच्या जोडीत बदल करावा असे मत मांडले आहे. कोहलीसह जैस्वालचा वापर करावा. रोहित चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. 3 -या क्रमांकावर सूर्यकुमार महत्त्वाचा ठरेल असे त्यांनी सुचवले आहे.

2 जूनपासून टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडसोबत पहिला सामना खेळणार आहे. त्या नंतर 9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT