Latest

राज्यात सौरऊर्जा प्रकल्पांची वाटचाल जोमात

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महावितरणच्या विकेंद्रित सौर कृषी ऊर्जा प्रकल्पांची वाटचाल जोमात सुरू आहे. प्रकल्पांसाठी वाढत्या प्रतिसादामुळे शेतकर्‍यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न साकार होऊ लागले आहे.राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,440 मेगावॅट क्षमतेचे करार करण्यात आले आहेत, तर राज्यभरात 108 सौर कृषिवाहिन्यांद्वारे सध्या 45 हजार 664 शेतकर्‍यांना वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषिवाहिनी योजनेअंतर्गत विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी महावितरणमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सौर ऊर्जा प्रकल्पांना वेग देण्यावर अधिक भर दिला असून त्याप्रमाणे यंत्रणा गतिमान झाली आहे. या योजनेमध्ये कृषी अतिभारित उपकेंद्राच्या 5 किलोमीटरच्या परिघात 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प कार्यान्वित करून संबंधित कृषिवाहिनीद्वारे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पांच्या निविदांना प्रतिसाद मिळावा यासाठी यंत्रणेमार्फत प्रसिद्धी व प्रकल्पधारकांच्या संपर्क मोहिमेला वेग दिला. परिणामी नुकत्याच काढलेल्या निविदांना तब्बल 385 मेगावॅट क्षमतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.396 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित महावितरणकडून राज्यभरात विविध ठिकाणी उभारलेल्या विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्पांमधील 1440 मेगावॅट क्षमतेच्या वीजखरेदीचे करार करण्यात आले आहेत. त्यापैकी 396 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. त्यात लवकरच 111 मेगावॅटची आणखी भर पडणार आहे. महावितरणच्या 2,725 उपकेंद्रांच्या 5 किलोमीटर परिघात कमीत कमी 3 तर जास्तीत जास्त 50 एकर क्षेत्रफळाच्या शासकीय व खासगी नापीक व पडीक जमिनी भाडेपट्टीवर घेण्यात येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT