सोलापूर : जगन्नाथ हुक्केरी
जिद्ध, जिकाटी, सातत्य यापेक्षा आत्मविश्वासाच्या बळावर काहीही अलौकिकत्व साध्य करता येते. हे पोलिओमुळे पाय निकामी झालेल्या सोलापूरच्या प्रशांत आरकल यांनी सिद्ध करुन दाखविले आहे. ताजिकिस्तानमध्ये पार पडलेल्या आशियाई सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत पाय गमविलेले व दिव्यांग असलेल्या धाडसी युवकाने देशाला ब्राँझपदक मिळवून देत अटकेपार झेंडा रोवला आहे.
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक क्षमता व बळ अत्यंत महत्त्वाचे असते. प्रशांत आरकालने चमकदार कामगिरी करत सुदृढ असलेल्या जगासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ते पॅरा सायकलपटू असून आदित्य मेहता फाउंडेशनच्यावतीने पॅरा-स्पोर्ट्स प्रशिक्षण, सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली त्याने ही कामगिरी केली आहे.
प्रशांत आरकाल हा दिव्यांग सायकलपटू आहेत. पोलिओमुळे त्यांच्या पायांची हालचाल थांबल्यामुळे तो हाताचा वापर करतो. सायकलिंग करतात आणि याच प्रकारात त्यांनी देशासाठी ब्राँझ पदक जिंकले आहे. हाताची सायकल म्हणजे तीनचाकी सायकल असे हे उपकरण आहे. जे पाय न वापरता हाताने चालवली जाते. प्रशांत मूळचा सोलापूरचा आहे. त्याचे वडील टॉवेल कारखानदार आहेत. सध्या तो सिंगापूर येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे.
प्रशांत हा सोलापूरच्या पूर्व भागात असलेल्या दाजी पेठ येथील रहिवासी. बालपणापासूनच तो दिव्यांग. मात्र मित्रांवर त्यांचा व मित्रांवर प्रचंड जीव. यामुळे मित्र त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायचे. शाळेला जाताना हाताची गाडी करुन त्यांना त्यावर बसवून शाळेत घेऊन जायचे. यामुळे आपण अपंग आहोत, हे कधीच वाटले नाही. माध्यमिक शिक्षण मार्कंडेय हायस्कूलमध्ये, तर कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकतनमध्ये घेतले. शिक्षणासाठी जाताना त्यांना नवीन इराबत्ती, विनायक श्रीगादी, प्रविण मडुरे यांच्या ग्रुपने फार मोठे सहकार्य केले. यामुळे त्यांना शिक्षण घेणे सुकर झाले. मुळात कुटुंबीयांचाही त्यांना आधार होताच. याशिवाय मित्र, शिक्षक, नातेवाईकांच्या रुपाने समाजानेही त्यांना मोठी मदत केली.
पॅरा सायकल स्पर्धा किंवा सरावासाठी वापरण्यात येणार्या सायकलची किंमत ही आठ लाख रुपये आहे. एवढे पैसे प्रशांतजवळ नव्हते. त्यांनी मित्रांबरोबर काम करुन त्यांच्या मदतीने आणि सहकार्य मिळवत गोळा केले आणि तब्बल आठ लाख किंमत असलेली सायकल विकत घेतली. आता याच सायकलवर ते सराव करण्याबरोबरच स्पर्धा जिंकत आहे.
कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशांत आरकाल नोकरीनिमित्त सिंगापूर येथे स्थायिक झाला. पहिल्यांदा सिंगापूरमध्ये राष्ट्रीय पॅरा गेम स्पर्धा झाल्या. यात सहभागी होण्याची संधी प्रशांतला मिळाली. तेथूनच प्रेरणा घेत त्याने पॅरा सायकल स्पर्धेत सहभाग घेण्याची मानसिक तयारी सुरु केली. यात त्यांना यशही मिळत आहे.
प्रशांतची जिद्द पाहून त्याचे काका गणेश आरकाल यांनी त्याला प्रोत्साहन देत राहिले. काकांच्या या पाठबळामुळे मी दिव्यांग आहे, ही भावना राहिली नाही. आर्थिक बाबींपासून ते मानसिक आधार देणे, विविध साहित्य पुरविणे याहून त्याचा हट्ट पुरविण्याचे कामही काका गणेश यांनी केल्याचे स्वत: प्रशांत आजही आनंदाने सांगतो.
२०१८ पासून तो पॅरासायकलिंगचे प्रशिक्षण घेत आहे. आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही त्याने भाग घेतला आहे. या आधी म्यानमार आणि उझबेकिस्तानमध्ये झालेल्या आशिया पॅरासायक्लिगं चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. परंतु कोणतेही पदक जिंकता आले नाही. पण आशा न गमावता सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि प्रबळ महत्त्वाकांक्षेने त्याने कास्यपदक जिंकले.
कामातून वेळ काढून आपल्या छंदाला जोपासणे थोडे कठीण आहे. आता भविष्यात २०२४ च्या ऑलम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे.
-प्रशांत आरकाल, विजेता स्पर्धक
आदित्य मेहता फौंडेशनच्या पॅरा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आणि पॅरा सायकलपटूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. याच प्रशिक्षणाच्या बळावर प्रशांत आणि ज्योतीने यश संपादन केले आहे. त्याचा अभिमान आहे.
– आदित्य मेहता, संस्थापक, एएमएफ