जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील एका वैमानिकाने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यामागील चमत्कारिक कारण समोर आले आहे. रुडोल्फ इरास्मस असे या वैमानिकाचे नाव आहे. 11 हजार फुटांवर विमान उड्डाण करत असताना अचानक रुडोल्फ यांना पाठीला थंड गोष्टीचा स्पर्श झाल्याचे जाणवले. त्यानंतर थोड्या वेळात त्यांना आपल्या पायलेट सीटच्या बाजूला चक्क एक नाग दिसला. मात्र, अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांचा जीव आपल्याच हाती असल्याचं भान ठेवत रुडोल्फ यांनी न घाबरता विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. रुडॉल्फ यांनी यशस्वीपणे फ्लाईट उतरवले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. रुडॉल्फ यांच्यावर या कामगिरीसाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, हा नाग इथे आलाच कसा, याबद्दल संभ्रम कायम आहे.
घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती रुडॉल्फनेच एका मुलाखतीदरम्यान दिली. घडलेला संपूर्ण प्रकार फारच धक्कादायक होता. मागील 5 वर्षांपासून वैमानिक म्हणून काम करत असलेल्या रुडॉल्फला पहिल्यांदाच असा विचित्र अनुभव आला. वॉर्सेस्टरवरून नेल्स्प्रूटला जणार्या एका छोट्या विमानाचे सारथ्य रुडॉल्फ करत होता. या विमानामध्ये 4 प्रवासी प्रवास करत होते.
पाठीला एखाद्या थंड गोष्टीचा स्पर्श झाल्यासारखे रुडॉल्फला वाटले तेव्हा वर ठेवलेल्या बाटलीमधून पाणी पडत असेल असा अंदाज त्याने व्यक्त केला. त्याने बाटली काढण्यासाठी हलचाल केली तेव्हा रुडॉल्फटच्या सीटच्या बाजूलाच नाग असल्याचे त्याला दिसले. सापाला पाहिल्यानंतर नेमकं काय घडलंय हे रुडॉल्फला समजण्यासाठी काही क्षणांचा अवधी गेला. मात्र, शांत राहण्याशिवाय रुडॉल्फकडे काहीही पर्याय नव्हता. त्यानेच घाबरून आरडाओरड केला असता तर प्रवाशीही घाबरले असते.
नाग सीटखाली बसलेला असतानाही रुडॉल्फने सावधपणे विमान चालवत ते लँड करण्याचा निर्णय घेतला. 'विमान लॅँड केल्यानंतर मी बाहेर पडलो आणि सीटखाली पाहिलं तेव्हा मला सीटखाली 4 फूट लांब नाग दिसला. तो सीटखाली वेटोळे घालून बसला होता. आम्हाला कठीण कालावधीमध्ये कसे वागावे यासंदर्भातील प्रशिक्षण दिले जाते. मात्र, यामध्ये सापासंदर्भातील प्रशिक्षणाचा समावेश नसतो असे रुडॉल्फने हसत सांगितले.