Latest

SRS in IPL : आयपीएलमध्ये डीआरएस ऐवजी आता एसआरएस!

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. यामध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेपेक्षाही अद्ययावत असते. आता आयपीएल 2024 पासून एक नवीन बदल होत असून यावर्षीपासून आयपीएलमध्ये 'डीआरएस'ऐवजी स्मार्ट रिप्ले सिस्टीम (एसआरएस) येणार आहे. ही डीआरएसची अद्ययावत आवृत्ती असणार आहे. या प्रणालीच्या मदतीने पंचांना योग्य निर्णय घेण्यास मोठी मदत होईल. ईएसपीएनने दिलेल्या अहवालात दावा केला जात आहे की, आयपीएल 2024 मध्ये डीआरएस नसून एसआरएस असेल.

या वृत्तात म्हटले आहे की, हॉक आयचे आठ हायस्पीड कॅमेरे संपूर्ण मैदानात ठेवण्यात येतील. निर्णय घेण्याची अचूकता आणि गती वाढवण्यासाठी स्मार्ट रिप्ले सिस्टीम वापरले जाईल. हॉक आयचे दोन ऑपरेटर हे टीव्ही पंचांसोबत असतील. टीव्ही पंचांना या दोन हॉक आय ऑपरेटरकडून थेट इनपुट मिळतील. हॉक आयच्या आठ हाय स्पीड कॅमेर्‍यांच्या मदतीने टिपलेले फोटो ते टीव्ही पंचांना देतील. आतापर्यंत टीव्ही ब्रॉडकास्ट डायरेक्टर हे थर्ड अंपायर आणि हॉक आय ऑपरेटर यांच्यामध्ये असायचे. या नव्या प्रणालीत टीव्ही डायरेक्टरच्या मदतीला दोन हॉकआय ऑपरेटरही असणार आहेत.

आतापर्यंत प्रसारकांना झेल घेताना क्षेत्ररक्षकाचे पाय आणि हात स्प्लिट स्क्रीनवर एकाच वेळी दाखवता येत नव्हते. पण आता नवीन प्रणालीमध्ये स्प्लिट स्क्रीनमध्ये पायांसह चेंडू केव्हा पकडला जातो आणि केव्हा सोडला जातो हे अंपायर पाहू शकतील. आयपीएल 2023 पर्यंत, हॉक आय कॅमेरे प्रामुख्याने बॉल ट्रॅकिंग आणि अल्ट्रा एजसाठी वापरले जात होते. त्यामुळे प्रसारकांनी एलबीडब्ल्यू आणि बॅटच्या किनार्‍याव्यतिरिक्त इतर कोणत्याही मैदानावरील रेफरल्ससाठी त्यांच्या स्वतःच्या कॅमेर्‍यातील फुटेज मोठ्या प्रमाणावर वापरले. यामध्ये स्टंपिंग, रन आऊट, झेल आणि ओव्हरथ्रोसाठी रेफरल्सचा समावेश होता.

स्टंपिंगसाठी नवीन प्रणाली टीव्ही अंपायरला तीन फोटो देणार आहे. साईड ऑन कॅमेर्‍यांचे फ्रंट ऑन फुटेजदेखील त्याच वेळी दिसेल. फ्रंट ऑन कॅमेरा अँगल महत्त्वाचा असतो कारण बेल्स पडून बाद झाल्याचा स्पष्ट फोटो मिळतो. पूर्वीचे ब्रॉडकास्टर स्टंप कॅमच्या फुटेजसह प्रत्येक बाजूचे कोन दाखवत असत. परंतु स्टंप कॅम्स सुमारे 50 फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने क्रिया रेकॉर्ड करतात, तर हॉक आय कॅमेरे सुमारे 300 फ्रेम्स प्रति सेकंद वेगाने रेकॉर्ड करतात.

आता पंचांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी अधिक अचूक फुटेज उपलब्ध असेल. स्मार्ट रिव्ह्यू सिस्टीम जमिनीपासून काही इंच वर पकडलेल्या कॅचच्या बाबतीतही अधिक स्पष्टता देईल. अशा संदर्भांमुळे भूतकाळात टीव्ही पंचांच्या निर्णयांवर वाद निर्माण झाला आहे. पण आता या नव्या प्रणालीमुळे निर्णय घेणे अधिक सुलभ होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT