Latest

सुगंधी वातावरणात झोपणे मेंदूसाठी ठरते लाभदायक

Arun Patil

वॉशिंग्टन : झोपेच्या काळात काही सुगंधांच्या संपर्कात आल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये नाट्यमयरीत्या वाढ होते. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हा दावा केला आहे. सुगंधित हवा ही विचारक्षमता तसेच स्मरणशक्ती यांच्याशी निगडीत मेंदूच्या न्यूरोलॉजिकल क्षेत्रांना प्रभावित करते याचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत. त्यामुळे सुगंधित हवेत झोपणे हे मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते असे त्यांचे म्हणणे आहे.

सुगंधित हवेमुळे बौद्धिक क्षमता वाढते. संशोधकांनी 60 ते 85 वर्षे वयाच्या 43 पुरुष व महिलांची यासाठी पाहणी केली. संशोधनात आढळले की रोज रात्री झोपण्यापूर्वी खोलीत परफ्यूम किंवा अत्तर शिंपडल्याने विचारक्षमतेमधील होणारी घट तसेच डिमेन्शियासारख्या विस्मरणाशी संबंधित आजाराची गती कमी केली जाऊ शकते.

वयोमानानुसार बौद्धिक क्षमता निरोगी ठेवण्यासाठी मेंदूच्या ग्रे मॅटरला सक्रिय ठेवणे महत्त्वाचे असते. त्याचा अर्थ रोज शब्दकोडी सोडवत बसणे असा नाही! मेंदूला गुंतवणूक ठेवण्यासाठी आसपासची प्रत्येक प्रकारची द़ृश्ये आणि ध्वनीही आत साठवणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधही मेंदूला सक्रिय ठेवतात. शारीरिक स्तरावर आपली विचारक्षमता व स्मरणशक्ती कमी होण्यापूर्वी आपली वास घेण्याची क्षमता कमी होते. वास घेण्याची क्षमता गमावणे हे मेंदूच्या पेशींच्या हानीशीही निगडीत आहे. संशोधकांनी एका समूहाला गुलाब, रोजमेरीसारख्या सुगंधाचे नैसर्गिक तेल दिले.

दुसर्‍या समूहाला त्यांनी नकली व कमी सुगंधाचे तेल दिले. दोन्ही समूहांना सहा महिने रोज रात्री हे तेल झोपण्यापूर्वी दोन तास आपल्या खोलीत शिंपडण्यास सांगितले. सहा महिन्यांनंतर या दोन्ही समूहातील लोकांच्या मेंदूच्या सक्रियतेचे परीक्षण करण्यात आले. त्यामध्ये पहिल्या समूहातील लोकांमध्ये 226 टक्के फरक दिसून आला. या समूहातील लोकांची विचारक्षमता तसेच स्मरणशक्ती यामध्येही चांगले बदल घडल्याचे दिसून आले.

SCROLL FOR NEXT