Latest

Kusal Mendis : मेंडिसने 65 चेंडूत शतक झळकावून ‘हा’ विक्रम केला आपल्या नावावर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र त्यानंतर कुसल मेंडिसने (Kusal Mendis) जबाबदारीने खेळ केला आणि संघाला अडचणीतून बाहेर काढले.

कुशलने (Kusal Mendis) आक्रमक खेळ करून पाकिस्तानच्या वेगवान मा-याची हवा काढली आणि अवघ्या 65 चेंडूत शतक पूर्ण केले. अशाप्रकारे मेंडिस हा विश्वचषकात श्रीलंकेसाठी सर्वात कमी चेंडूंमध्ये शतकी खेळी साकारणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता. संगकाराने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये 70 चेंडूत शतक झळकावले होते.

अवघ्या 5 धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेने पहिली विकेट गमावली तेव्हा मेंडिस (Kusal Mendis) क्रीजवर आला. त्यानंतर त्याने पाकच्या वेगवान गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने निसांकाच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली. हसन अलीच्या चेंडूवर षटकार ठोकून मेंडिसने आपल्या डावाचे शतकात रूपांतर केले. तो 77 चेंडूंत 14 चौकार आणि 6 षटकारांसह 122 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकार मारले. पाकचा वेगवान गोलंदाज हसन अलीने कुसल मेंडिसला माघारी धाडले. सीमारेषेजवळ इमाम उल हकने त्याचा झेल पकडला. 2 सामन्यांच्या 2 डावात 198 धावा करून मेंडिस हा विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

मेंडिसने (Kusal Mendis) 2016 मध्ये आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 114 एकदिवसीय सामन्यांच्या 111 डावांमध्ये सुमारे 33 च्या सरासरीने 3,300 हून अधिक धावा केल्या आहेत. त्‍याने त्‍याच्‍या एकदिवसीय करिअरमध्‍ये 3 शतके आणि 26 अर्धशतके झळकावली आहेत. मेंडिस गेल्या काही वर्षांपासून त्याच्या संघाचा विश्वासार्ह फलंदाज आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात मेंडिस सर्वात जलद शतक झळकावणारा जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. या यादीत एडन मार्कराम (49 चेंडू, वि. श्रीलंका, 2023) पहिल्या स्थानी आहे. तर त्यानंतर केविन ओब्रायन (50 चेंडू, वि. इंग्लंड, 2011), ग्लेन मॅक्सवेल (51 चेंडू, वि. श्रीलंका, 2015) , एबी डिव्हिलियर्स (52 चेंडू, वि. वेस्ट इंडिज, 2015) आणि इऑन मॉर्गन (57 चेंडू, विरुद्ध अफगाणिस्तान, 2019) यांचा क्रमांक लागतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT