नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क; ड्रग्ज रॅकेटमधून सत्ताधारी व मंत्र्यांना हप्ते मिळत असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केला आहे. ड्रग्ज रॅकेटमधून एका आमदाराला सोळा लाखांचा हप्ता मिळतो, असे सहा आमदार असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात मोर्चा आहे. त्यापूर्वी पत्रकारपरिषद घेत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ड्रग्ज माफिया आणि हप्ते घेणा-यांना राज्याचे गृहमंत्री फडणवीस वाचवत आहे. ड्रग्जच्या नशेची गुंगी गृहमंत्र्यांना चढली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.
फडणवीसांना विरोधकांची सर्व माहिती असते, मग त्यांना ड्रग्ज माफियांची माहिती कशी नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. खरेतर ड्रग्ज माफियांचे साथीदार विधानसभेत आहेत. ड्रग्ज माफियांना पाठिशी घातले जात आहे. असा गृहमंत्री महाराष्ट्राला मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव्य आहे. गुजरातची पॉलिसी महाराष्ट्रात राबविली जाते आहे. यातून एक पिढी बरबाद होते आहे. हे थांबले नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरले. आजच्या मोर्चाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असल्याचे राऊत म्हणाले.
विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. नीलम गोऱ्हे तुम्ही ड्रग्ज रॅकेटचे सदस्य आहेत का ? नीलम गोऱ्हे यांनाही हप्ता जातो का? असा सवाल राऊतांनी केला.