Latest

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत आणखी सहा मृतदेह सापडले

Arun Patil

इर्शाळवाडी (खालापूर), प्रशांत गोपाळे : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत (Irshalwadi Landslide) दुसर्‍या दिवशीच्या शोधकार्यादरम्यान शुक्रवारी आणखी सहा मृतदेह सापडले. यामध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे मृतांची संख्या 22 झाली आहे. कमल मधू भूताब्रा (वय 45), कान्ही रवी वाघ (45), हसी पांडुरंग पारधी (50), मधू नामा भूताब्रा (55), पांडुरंग घाऊ पारधी (55) आणि रवींद्र पदू वाघ (46) अशी मृतांची नावे आहेत.

रायगड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इर्शाळवाडीची लोकसंख्या 228 आहे. आपत्तीनंतर यापैकी 98 ग्रामस्थांना वाचवले आहे. ते सर्व सुरक्षित आहेत. पाच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत 103 ग्रामस्थ बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ढिगार्‍याखाली मृतांची संख्या मोठी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, आता परिसरात दुर्गंधी पसरली आहे. (Irshalwadi Landslide)

विविध पथकांच्या माध्यमातून शुक्रवारी सकाळी सहापासूनच शोधकार्य सुरू करण्यात आले; पण धो-धो कोसळणारा पाऊस आणि गडद धुक्यामुळे प्रचंड अडथळे निर्माण झाले. इर्शाळवाडीत बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास महाकाय दरड कोसळून अनेक घरे गाडली गेली आहेत. गुरुवारी 16 मृतदेह ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आले होते. 'एनडीआरएफ', 'एसडीआरएफ' आणि स्वयंसेवी संस्थांची पथके असे 500 हून अधिक कार्यकर्ते मदतकार्यात आहेत.

घटनास्थळी खालापूरचे प्रांताधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खालापूरचे पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांचे पथक तळ ठोकून आहे.

SCROLL FOR NEXT