मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क
एखाद्या महिलेच्या खाटेवर बसून मध्यरात्री तिच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तिचा विनयभंगच आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीने महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करणे म्हणजे हा तिचा विनयभंग आहे, असे खंडपीठाने पुढे स्पष्ट केले.
न्यायमूर्ती मुकुंद सेवलीकर यांच्या खंडपीठासमोर जालना जिल्ह्यातील ३६ वर्षीय परमेश्वर ढगे याने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी सुरु आहे. शेजारी असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीला कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविले. न्यायालयाने त्याला दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या निर्णयाला त्याने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे.
फिर्यादीच्या खटल्यानुसार, जुलै २०१४ मध्ये ढगे हा सायंकाळच्या वेळी पीडितेच्या घरी गेला आणि तिला तिचा पती घरी कधी परत येणार असे विचारले. तिने त्याला सांगितले की, तिचा नवरा परगावी गेला आहे आणि तो रात्री परत येणार नाही. त्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ढगे पुन्हा पीडित महिलेच्या घरी गेला, तेव्हा पीडिता झोपली होती. त्याने तिच्या घराचा दरवाजा उघडला. दरवाजाला आतून कडी नव्हती. आणि तो तिच्या खाटेवर जाऊन बसला आणि त्याने तिच्या पायाला स्पर्श केला.
दरम्यान, आरोपीने आपला बचाव करत दावा केला की त्याचा विनयभंग करण्याचा कोणताही हेतू नव्हता. यावर न्यायमूर्ती सेवलीकर म्हणाले, "रेकॉर्डवरील नोंदीनुसार हे स्पष्ट होते की ढगे यांचे कृत्य महिलेच्या विनयशीलतेला धक्का पोहोचवणारे होते."
"तो पीडितेच्या पायाजवळ बसला आणि त्याने तिच्या पायाला स्पर्श केला. तो तिच्या खाटेवर बसला होता. हे त्याचे वर्तन लैंगिक हेतूने होते. तसेच रात्रीच्या वेळी त्याने पीडितेच्या घरी जाण्याचे अन्य कोणतेही कारण नव्हते." असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
न्यायमूर्तींनी पुढे नमूद केले की, ढगे हा रात्रीच्या वेळी पीडितेच्या घरी काय करत होता याचे तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. शिवाय, रात्रीच्या वेळी एखाद्या महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करणे म्हणजे तिचा विनयभंग करणे होय.
"यावरुन हे स्पष्ट होते की आरोपी हा लैंगिक हेतूने शेजारी महिलेच्या घरी गेला होता आणि त्याने तिचा विनयभंग केला. त्यामुळे ढगे याला विनयभंग प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविण्यात कोणतीही चूक केली नाही," असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.
हे ही वाचा :