Latest

माझ्या जीवाची किंमत फक्त तीन हजार रुपये ! हेरंब कुलकर्णींची पोस्ट चर्चेत

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : सामाजिक कार्यकर्ते व सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी सावेडीत गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात कुलकर्णी जखमी झाले होते. या प्रकरणात ४८ तासानंतरही तक्रार दाखल झाली नव्हती. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी एसपींकडे धाव घेतली होती. हा हल्ला शाळेसमारील पानटपरीची तक्रार केल्याच्या रागतून झाला. अवघ्या 15 हजार रुपयांचा हल्लेखोरांना कुलकर्णी यांना मारण्याची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात निषन्न झाले. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपी पसार आहेत. यादरम्यान हेरंब कुलकर्णी यांची फेसबूक पोस्ट चर्चेत आहे.

आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, "

माझ्या
जगण्याची किंमत……
मारणारे ५ जण
प्रत्येकाच्या वाट्याला फारतर ३००० रू आले
इतक्या अल्प रकमेसाठी एखाद्याचा जीव घ्यावासा वाटतो…
अनाकलनीय.."

अक्षय विष्णू सब्बन (रा. दातरंगेमळा, नगर), चैतन्य सुनील सुडके (रा. सुडके मळा) व एका अल्पवयीन मुलाचा आरोपीमध्ये समावेश आहे. अक्षय व सनी जगधने असे दोघे पसार आहेत. अधिक माहिती अशी, आरोपी अक्षय सब्बन याची सीमाराम सारडा शाळेजवळ पानटपरी होती. याबाबत मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर मनपाने ती टपरी काढून टाकली. त्यामुळे पोलिसांना सुरूवातीपासून सब्बन याच्यावर संयश होता. पोलिसांनी दिल्लीगेट, पत्रकार चौक, पे्रमदान चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सीसीटीव्ही आरोपी दुचाकीवर पाठलाग करीत असल्याचे दिसले.

त्यातील दुचाकी चालविणारा अल्पवयीन आरोपी मंगलगेट परिसरातील असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला मंगलगेट येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता अन्य नावसमोर आली. तपासादरम्यान पोलिस सुडकेे याच्या घरी पोचले. त्यानंतर आरोपी सनी जगधने याच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलगा, सुडके व पसार अक्षय यांनी दुचाकीवरून येऊन रासने नगर परिसरात हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला. जगधने याने पंधरा हजारांचा सुपारी देत त्याला संपून टाका असा आदेश दुचाकीस्वारांना दिला होता. त्यांनी पाठलाग करीत कुलकर्णी यांची दुचाकी अडवून हल्ला केला. आता हा कट कसा रचला गेला हे आरोपी जगधने याला अटक केल्यानंतर समोर येणार आहे.

ऊसात दडला आरोपी
सुडके नावाचा आरोपी ऊसात दडून बसला होता. आरोपी घरी गेल्यानंतर तो दिसून आला नाही. त्याच्या भावाला पोलिसांनी विश्वात घेल्यानंतर तो पोलिसांना ऊसाजवळ घेऊन गेला. भावाने संवाद साधल्यानंतर तो ऊसाबाहेर आला पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

आरोपींना दोन दिवसांची कोठडी
हेरंब कुलकर्णी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले. काल दोघांना न्यायलायात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

सरकार गुंडांना पोसतेय
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी आज सकाळी हेरंब कुलकर्णी यांची भेट घेतली. ते म्हणाले, हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याची घटना गंभीर आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर कायदा रद्द करा. आपल्या पुढच्या पिढ्यांना गुटखा खाऊद्या. कायदे असे की करा की त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अन्यथा सर्व कायदे रद्द करा. शाळेच्या कायद्यात एक किलोमीटरच्या परिसरात दारूचे दुकान नको आहे. परंतु, कायदा सर्रास पायदळी तुडविला जात आहे. हप्ते खाण्याची संधी म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. गुटख्याच्या माध्यमातून गुंड पोसले जात आहेत, अशी सरकारची भूमिका दिसत आहेे.

विश्वंभर चौधरी

SCROLL FOR NEXT