Latest

Sinner Bazar Samiti Election Result | वाजे-सांगळेंचा माणिकरावांना धक्का!

अंजली राऊत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा धक्का दिला. कोकाटे समर्थक दोन संचालकांना फोडून समवेत घेत त्यापैकी एक असलेल्या शशिकांत गाडे यांना सभापतिपदाची संधी देण्यात आली. या निवडणुकीनिमित्त गेल्या दोन दिवसांत नाट्यमय घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या.

डॉ. रवींद्र पवार यांचे पद रद्द झाल्याने जाहीर झालेल्या सभापतिपदाच्या निवडीसाठी प्राधिकृत अधिकारी तथा नाशिकचे सहायक निबंधक राजीव इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात सकाळी ११ च्या सुमारास निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. सभापतिपदासाठी कोकाटे गटाचे संचालक संजय खैरनार, तर वाजे-सांगळे गटातून शशिकांत गाडे यांनी अर्ज दाखल केला. गाडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून शरदराव थोरात, अनुमोदक म्हणून जालिंदर थोरात यांनी स्वाक्षऱ्या केल्या. खैरनार यांना विनायक घुमरे व रवींद्र शिंदे सूचक, अनुमोदक होते. दोन्ही अर्ज वैध ठरले. तथापि, माघारीच्या मुदतीत कोकाटे गटाचे संजय खैरनार यांनी माघार घेतल्याने गाडे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

यावेळी उपसभापती सिंधुताई कोकाटे, संचालक भाऊसाहेब खाडे, अनिल शेळके, सुरेखा पांगारकर, नवनाथ घुगे, श्रीकृष्ण घुमरे, गणेश घोलप, प्रकाश तुपे, सुनील चकोर, रवींद्र शेळके, नवनाथ नेहे आदी उपस्थित होते. निवड प्रक्रियेत प्राधिकृत अधिकारी इप्पर यांना सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव यांनी साहाय केले.

विरोधकांचा गोड गैरसमजः वाजेंचा निशाणा
कुणाच्या उपकाराने शशिकांत गाडे सभापतिपदी विराजमान झालेले नाहीत. ते स्वतः आमच्याकडे आले आहेत. मात्र आमच्या सांगण्यावरून गाडे शिवसेनेत आले, असे कोणाला वाटत असेल, तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे, असे सांगत राजाभाऊ वाजे यांनी आमदार कोकाटे यांच्यासह समर्थकांवर निशाणा साधला.

अर्ज दाखल करण्यापूर्वी गाडेंचा ठाकरे गटात प्रवेश
सहलीहून सिन्नरमध्ये दाखल होताच शशिकांत गाडे हे राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले. तिथेच त्यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला. यावेळी संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'गाडे कोकाटे साहेबांचे कट्टर; सभापती झाल्याचा आनंद'
सभापतिपदी गाडे यांची निवड झाल्यानंतर कोकाटे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती ॲड. राजेंद्र चव्हाणके, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, संचालक संजय खैरनार, अनिल शेळके, पकज जाधव, कृष्णा कासार, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन नितीन आव्हाड, माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ गडाख आदींनी गाडे यांचा सत्कार केला. गाडे हे आमदार कोकाटे यांचे कट्टर समर्थक असून ते सभापतिपदी विराजमान झाल्याचा आनंद आहे, असे ॲड. चव्हाणके यावेळी म्हणाले.

विकासासाठी आमदार कोकाटेंनाही साकडे घालणार
राजाभाऊ वाजे यांची आणि माझी गेल्या अनेक वर्षांची मैत्री आहे. मात्र राजकारण आणि मैत्रीत मी गल्लत केलेली नाही. आता त्यांनी मला सभापतिपद दिले आहे. त्यामुळे आजपासून यापुढची प्रत्येक निवडणूक मी राजाभाऊ वाजे यांच्या सोबत राहीन. तथापि, शेतकरी हित आणि बाजार समितीच्या विकासासाठी मला आमदार कोकाटे यांना भेटण्यात काहीही गैर वाटणार नाही. राजाभाऊ वाजे, उदय सांगळे आणि आमदार कोकाटे यांच्याकडून शेतकरी हिताची कामे करून घेणार असल्याचे गाडे यांनी सांगितले.

गुलालाची उधळण; विजयी मिरवणुकीने आनंदोत्सव
गाडे यांची सभापतिपदी निवड झाल्यानंतर बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. वाजे – सांगळे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. विजयी मिरवणूक काढण्यात आली. वावी वेस, गणेश पेठ मार्गे त्यांच्या संपर्क कार्यालयाजवळ मिरवणुकीचा समारोप झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT