Latest

सिंधुदुर्ग : नागपंचमी दिवशी ‘भल्ली भल्ली भावय’ खेळाची परंपरा; लहानांसह मोठ्यांचाही असतो सहभाग

backup backup

नांदगाव; पुढारी वृत्तसेवा : बच्चे कंपनीला मज्जा मस्ती तर तरूण वर्गासाठी कौशल्य पणाला लावणारा खेळ म्हणजे भल्ली भल्ली भावय… सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कोळोशी येथे नागपंचमीच्या दिवशी येथील पावणादेवी मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी प्रमाणे रंगलेल्या पारंपरिक भल्ली….भल्ली… भावय खेळाची परंपरा मोठ्या उत्साहात साजरी झाली. चिखल, माती, पाणी एकमेकांवर उडवून मज्जा लुटत या खेळात बच्चे कंपनीपासून वयोवृध्दांनीही मनसोक्त माखून आनंद लुटला. हा आगळावेगळा खेळ पाहण्यासाठी स्थानिकांसह परीसरातील नागरीकांनी मोठी गर्दी  केली होती.

'भल्ली….भल्ली….भावय….' कोकणातील सणाला विविध महत्त्व असते. प्रत्येक सणाची एक वेगवेगळी आख्यायिका सांगितली जाते. यातच सिंधुदुर्गातील सणचा एक वेगळाच थाट असतो. असाच श्रावण महिन्यात विशेषता नागपंचमी दिवशी होणारी कोळोशी येथील भल्ली भावय हा खेळ एक  वेगळाच अनुभव देऊन जातो. कोळोशी गावातील रहिवाशी नागपंचमीच्या दिवसाला येथील पावणादेवी मंदिराच्या प्रांगणात पारंपरिक 'भल्ली भल्ली भावय' हा पारंपरिक खेळ चांगलाच खेळला जातो. लहान, थोरांचा सहभाग असलेला आणि चिखलात खेळला जाणारा हा खेळ पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थासहय,नागरीक  व मुंबईतील चाकरमान्यानीही उपस्थित असतात.

कोळोशी येथील पावणादेवी मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी भल्ली भल्ली भावय हा पारंपरिक पण कौशल्य पणाला लावणारा खेळ खेळला जातो.यासाठी ग्रामस्थ सकाळी गावचे ग्रामदैवत असलेल्या गांगेश्वर मंदिरात एकत्र होऊन सर्व पुजा विधी पुर्ण करून पुढील कामासाठी देवाकडून परवानगी घेतात त्यानंतर मंदिरात भोजन करुन दुपारनंतर तरंग आपल्या लवाजम्यासहित पावणादेवी मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतात.तरंग पावणादेवी मंदिरात पोहचल्यावर याठिकाणी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरु होतो यावेळी माहेर वाशीनींसह परीसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात रंगतो तो सर्वांना उत्सुकता लागून राहिलेला भल्लीभल्ली भावय हा पारंपारिक खेळाला सुरवात झाली.

एका हातात आंब्याचा टाळ आणि एका हातात लाकडी खुंटी घेवून चिखलात बसून ढोल ताशांच्या गजरात भल्ली भल्ली भावयचा गजर करत हा खेळ खेळण्यास सुरवात होते. स्वतःला व खेळणार्या इतरांना चिखल लावत अंगावर पाणी ओतत हा खेळ अधिकच रंगत आणत होता.लहान मुलेही या खेळाचा मनमुराद आनंद लुटतात. यावेळी तरूण व वरिष्ठ मंडळी भल्ली भल्ली भावयचा जयघोष करीत एकमेकांना साद घालत होते. या खेळामुळे परिसरची साफसफाई होते. भावय संपल्यानंतर सर्वजण वनराईत असलेल्या पाषानातील पाणी अंगाला लावून तळीमध्ये आंघोळीचा आनंद घेत होते. याचवेळी गेली अनेक वर्षे चालु असणारी परंपरा कोळोशी वासीय आजही जपत आहेत.तसेच आजच्या नागपंचमीच्या निमित्ताने कोळोशीत होणाऱ्या भावय खेळाचा सोहळा पाहण्यासाठी परीसरातील नागरिकांसह महीलांनाही एकच गर्दी केली होती.

यात शेवटी एक कौशल्य पणाला लावणारा सापड खेळ दोघांमध्ये खेळला जातो.एकजन उलटी मांडी घालून जमिनीवर डोके हात विशीष्ट पध्दतीने ठेवून जमिन धरतो. त्यावेळी दुस-याने  त्याच पद्धतीने आपल्या खांद्याच्या सहाय्याने त्याला जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न केला जातो.यामध्ये कौशल्य पणाला लावले जाते. खेळाच्या शेवटी एकजण अंगात आल्याचे सोंग घेतो. तर एकाला डूकर बनवून चौघेजण त्याचे हातपाय पकडून हर हर महादेव गर्जना करीत मंदिराभोवती फिरवतात मात्र आजही कोळोशी ग्रामस्थ भावयची परंपरा राखत आहेत.

SCROLL FOR NEXT