Latest

silicon valley bank : महत्वाची बातमी! एसव्हीबी बुडाल्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही

Arun Patil

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : silicon valley bank :  सिलिकॉन व्हॅली बँकेच्या (एसव्हीबी) ठेवीदारांना सोमवारपासून त्यांचे पैसे संपूर्णपणे परत मिळतील, अशी ग्वाही अमेरिकी प्रशासनाने सोमवारी दिली. आपल्या बँकिंग प्रणालीवर जनतेचा विश्वास बळकट करून अमेरिकन अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने या प्रशासनाने हे पाऊल उचलले.

दरम्यान सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) बुडाल्याने जगभरातील स्टार्टअप कंपन्यांवर काळे ढग घोंघावू लागले असले, तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर, येथील बँकांवर एसव्हीबी बंद झाल्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
ठेवीदारांना त्यांचे सर्व पैसे मिळतील. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या ठरावाशी संबंधित कोणतेही नुकसान करदात्यांचे होणार नाही,' असे ट्रेझरी डिपार्टमेंटने एका निवेदनात म्हटले आहे.

'न्यूयॉर्कमधील सिग्नेचर बँक हीदेखील आज बंद झाली. या बँकेच्या ठेवीदारांचेही पैसे लगेच परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,' असे या निवेदनात म्हटले आहे. इंटरएजन्सी फेडरल स्टेटमेंटनुसार, बँकेचे शेअरहोल्डर्स आणि काही असुरक्षित कर्जधारकांना मात्र पैसे देण्यात येणार नाहीत. 'बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला हटवण्यात आले आहे. विमा नसलेल्या ठेवीदारांना आधार देण्यासाठी ठेव विमा निधीचे कोणतेही नुकसान कायद्यानुसार आवश्यक असलेल्या बँकांच्या विशेष मूल्यांकनाद्वारे वसूल केले जाईल,' असे त्यात म्हटले आहे.

silicon valley bank : बँकिंग क्षेत्रात खळबळ

स्टार्ट-अप, व्हेंचर कॅपिटलिस्ट (व्हीसी) आणि टेक फर्म्स अशा विशिष्ट कंपन्यांना उचलून धरून, त्यांच्यात गुंतवणूक करून इनोव्हेशन इकॉनॉमीचा आर्थिक भागीदार असे म्हणवून घेणार्‍या सिलिकॉन व्हॅली बँकेचा कारभार गेल्या शुक्रवारी अमेरिकेतील बँकिंग नियामकांनी थांबविला. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या व बँकिंग उद्योगामध्ये खळबळ उडाली आहे. एसव्हीबी अमेरिकेतील सोळावी सर्वात मोठी बँक होती.

गेल्या एका आठवड्यात अमेरिकेत तीन बँका बुडल्या. यातील पहिली सिल्व्हरगेट, दुसरी सिलिकॉन व्हॅली बँक आणि तिसरी सिग्नेचर बँक. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या इतिहासात बँक बुडणे ही फार मोठी घटना मानली जाते. 2008 च्या मंदीनंतर तेथे अशा प्रकारे कोणत्याही बँका बुडालेल्या नाहीत. याआधी, वॉशिंग्टन म्युच्युअल बँक सप्टेंबर 2008 मध्ये कोसळली होती. तिच्याकडे 307 अब्ज डॉलरची कर्जे आणि 188 अब्ज डॉलरच्या ठेवी होत्या. एसव्हीबीकडेही बुडण्यापूर्वी 209 अब्ज किमतींची कर्जे आणि 175 अब्ज डॉलरच्या ठेवी होत्या.

एखाद्या स्टार्टअपला इतर कोणतीही बँक कर्ज देत नसेल, तरी एसव्हीबीने अशा कंपन्यांना कर्जपुरवठा केला. त्यामुळे स्टार्ट-अप संस्थापकांमध्ये ही बँक हिरो बनली. केवळ स्टार्ट-अपच नव्हे, तर गुंतवणूकदारांसाठीदेखील एसव्हीबी ही गुंतवणूकदारांसाठीची खास बँक म्हणून ओळखली जाऊ लागली होती. तिच्याकडे अडीच हजारांपेक्षा जास्त व्हीसी कंपन्यांच्या ठेवी होत्या. गेल्या काही वर्षांत, तिने सिक्वीया कॅपिटल, अ‍ॅक्सेल पार्टनर्स आणि ग्रेलॉक यांसह अनेक व्हीसीमध्ये गुंतवणूक केली आहे.
एचएसबीसी घेणार एसव्हीबीची ब्रिटिश कंपनी

silicon valley bank : लंडन ः सिलिकॉन व्हॅली बँकेची यूकेमधील कंपनी विकत घेण्यास एचएसबीसी होल्डिंग्ज ही कंपनी सज्ज झाली आहे. एचएसबीसी यूके बँक ही कंपनी सिलिकॉन व्हॅली बँक यूके लि. या कंपनीचे शेअर्स एक पौंड प्रति शेअर या दराने विकत घेत आहे. एसव्हीबी बँकेच्या विविध शाखांचे आणखी पतन टाळण्याच्या दृष्टीने ब्रिटिश सरकार आणि काही बँका काही मार्ग शोधत आहेत. त्या अनुषंगाने एचएसबीसीच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आहे. एसव्हीबी बँकेची यूकेमधील ही शाखा विकत घेणे ही आमच्यासाठी या देशात उभे राहण्याची एक मौल्यवान संधी आहे, असे एचएसबीसी होल्डिंग्जचे सीईओ नोएल क्विन यांनी म्हटले आहे.
सिलिकॉन व्हॅली बँक विकत घेण्याची अ‍ॅलन मस्क यांची तयारी

silicon valley bank : सॅन फ्रॅन्सिस्को : टेस्ला ही इलेक्ट्रिक कार जगभरात लोकप्रिय करून जगातील सर्वात धनाढ्य बनलेले एलॉन मस्क यांनी आता सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) ही बंद पडलेली अमेरिकेतील बँक खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. तोट्यात गेलेल्या एसव्हीबी या बँकेला अमेरिकी नियामक संस्थांनी काल टाळे लावल्यावर आता तिचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला असताना, मस्क यांनी आपला हात उंचावला आहे. मला वाटते, ट्विटरने एसव्हीबी विकत घ्यावी आणि डिजिटल बँक बनावे, असे ट्विट रेझर या एका इलेक्ट्रॉनिक कंपनीचे सह-संस्थापक मिन-लियांग टॅन यांनी केले. त्यास मस्क यांनी ट्विट करूनच उत्तर दिले, मी या कल्पनेसाठी तयार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT