Latest

silent killer : हवेत उडणारा ’सायलंट किलर’!

Arun Patil

कॅलिफोर्निया : जगातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, त्याची रचना अतिशय समजून-उमजून तयार केली गेली आहे, याचा पावलोपावली आपल्याला प्रत्यय येत असतो. अशा अनेक गोष्टी असतात, ज्या पाहून आपण क्षणभर स्तिमित होऊन जातो. काही जीव जे कमकुवत असतात, त्यांना त्यातून बचावासाठी काही खास दैवी देणगी मिळालेली असते. उदाहरणार्थ, घुबड दिवसा काहीही पाहू शकत नाहीत. यामुळे त्यांना केवळ रात्रीच्या वेळीच सावज टिपणे शक्य होते. रात्रीच्या सन्नाटात सावज या घुबडांचा आवाज ओळखून सावध होऊ शकतात. यामुळेच त्यांना असे पंख लाभले आहेत, ज्यांचा किंचितही आवाज होत नाही आणि याच कारणामुळे त्यांना 'सायलंट किलर' या नावाने ओळखले जाते.

एरवी अन्य कोणतेही पक्षी असोत, हवेत उडत असताना त्यांच्या पंखांचा आवाज हमखास येतो. पंख हवेला मागे सारत पुढे सरकण्यासाठी मदत करतात. मात्र, घुबड रात्रीच हवेत झेपावतात. त्यांच्या शरीराची रचनाच अशी असते की, त्यांच्या पंखांचा आवाज येत नाही. हीच बाब अधोरेखित करण्यासाठी काही जणांनी काही प्रयोग राबवले आणि त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत अनेक पक्ष्यांचा वापर करण्यात आला. त्यात या पक्ष्यांना एका बाजूने दुसर्‍या बाजूपर्यंत जायचे होते आणि त्यांच्या उड्डाण मार्गात काही माईक लावण्यात आले होते. अन्य सर्व पक्ष्यांचे या माईकमध्ये आवाज टिपले गेले. मात्र, घुबडाने झेप घेतली, त्यावेळी त्याचा आवाज अजिबात आला नाही. घुबडांच्या पंखांचा आवाज का येत नाही, ते ही रंजक आहे. याचे कारण असे की, त्यांच्या पंखांमध्ये कंगव्याप्रमाणे गॅप असतो आणि यातून हवा आरपार जाते आणि यामुळे वारा पंखांवर आदळून त्याचा आवाज येत नाही. याचमुळे ते उडताना पंखांचा आवाज येत नाही आणि अंधारात ते आपले सावज सहजपणे टिपत तेथून पसार होऊ शकतात!

SCROLL FOR NEXT