Latest

पेन किलर्स : मनाने घेतलेल्या गोळ्यांमुळे ‘या’ समस्या उद्भभू शकतात!

अमृता चौगुले

घराघरात सर्रासपणे वापरल्या जाणार्‍या वेदनाशामक औषधांविषयी अनेकांना पुरेशी माहिती नसते, तर कित्येकांना हृदयाचा विकार असल्याचे माहीत नसल्याने काहीशी लक्षणे दिसताच पेनकिलर्स घेण्याची वाईट सवय जडल्याचे दिसून येते. मनाने घेण्यात येणार्‍या या गोळ्यांमुळे अनेकदा रक्तदाब वाढू शकतो. तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तर देखील वाढू शकतो.

पेनकिलर्स किडनी, हृदय तसेच शरीरातील इतर अवयवांवर विपरीत परिणाम करतात. तसेच या गोळ्यांचे सेवन करताना उपाशीपोटी त्यांचे सेवन करणे, एकाहून अधिक गोळ्या घेणे, प्रत्येक गोष्टीसाठी लगेचच गोळ्या घेणे टाळावे. असह्य वेदना होत असल्यास स्वतःच्या मर्जीने औषधोपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. पेनकिलरचा अतिवापर हा मेंदूवर परिणाम करत असून मेंदूसंबंधित आजारांमध्ये वाढ होत असल्याचे अनेक संशोधनातून समोर आलेले आहे. बरीच पेनकिलर्स नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (एनएसआयडी) आहेत. कुठलीही पेन किलर विकत घेताना ती एनएसआयडी आहे की नाही, ते तपासून पाहा. जर, तसे असेल तर मग या औषधाचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. ताप, वेदना दूर करण्यासाठी हे औषध वापरले जाते. त्यात स्टिरॉइड्स नसतात मात्र जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्रपिंड, हृदय आणि यकृतासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. वेदना कमी करणारे औषध म्हणून ओपिओईड्सदेखील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होते.

कर्करोगाच्या उपचार दरम्यान वेदनेसाठीदेखील यांचा वापर केला जातो. हे औषध दीर्घकालीन वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. मात्र, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतले गरजेचे आहे. या औषधामुळे बद्धकोष्ठता, नैराश्य, मूत्रसंसर्ग, उलट्या यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय इबुप्रोफेन पेनकिलर्स पोटदुखी, मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्येचा धोकादेखील वाढवतात.

अशक्तपणा आलाय, गरगरल्यासारखे होतेय, अंग दुखतेय, आज डोकं जाम दुखतेय, थोडी कणकण जाणवतेय, अशा लहानसहान कारणांसाठी बर्‍याचदा पेनकिलरचा पर्याय निवडतात. याने तात्पुरता आराम तर मिळतो; मात्र हळूहळू त्याचे दुष्परिणामही शरीरावर दिसून येतात.

-डॉ. प्रशांत पावशे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT