ठाणे; अनुपमा गुंडे : वात्सल्य, प्रेम, भारतीय कुटुंबपध्दती आणि संस्कृतीचे मापदंड समजले जाणारे, साहित्यविश्वात तसेच मराठी माणसांच्या मनावर गारूड असणाऱ्या साने गुरुजी लिखित श्यामची आई… हे पुस्तक. हेच श्यामची आई पुस्तक आता चिनी लोकांनाही वाचण्याची संधी मिळणार आहे. मूळ मुंबईची आणि सध्या चीनमध्ये शिक्षणासाठी वास्तव्य करणाऱ्या रसिका पावसकर या विद्यार्थिनीने या श्यामची आई पुस्तकाचा चीनमध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या चिनी मँडीन बोलीभाषेत अनुवाद केला आहे.
२०१४ मध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या रसिकाला वैद्यकीय शाखेत शिक्षण घ्यायचे होते, मात्र मनासारखे महाविद्यालय न मिळाल्याने तिने एक वर्ष थांबायचे ठरवले. या काळात तिने चिनी भाषेच्या वर्गात प्रवेश घेतला, ही भाषा शिकतानाच तिची या भाषेबद्दलची उत्सुकता वाढल्याने तिने पुढे याच भाषेत करिअर करण्याचा निर्णय घेतला. रूपारेल महाविद्यालयात इंग्रजी साहित्यात पदवी घेत असतानाच, तिने मुंबई विद्यापीठात चिनी भाषा शिकण्यासाठी रितसर प्रवेश घेतला.
शेवटच्या वर्षात असताना तिला चीनच्या हनान प्रोविन्समधील चंगचौ युनिव्हर्सिटी (Zhengzhou Uni- versity) मध्ये चिनी भाषा शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीत एक वर्ष भाषेचा अभ्यास व नंतरची चार वर्षे चिनी भाषेचा शिक्षक
होण्याची बॅचलर्सची डिग्री (आपल्याकडचे बीएड) असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. २०२० मध्ये कोरोना सुरू झाल्यावर रसिकाही भारतात परतली, मात्र तिचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. तिला वाचनाची आवड असल्याने त्यातूनच तिने 'श्यामची आई' या पुस्तकाचा अनुवाद करायला घेतला. या भाषांतराची सुरुवात तिने चीनमध्येच केली होती, मात्र कोरोनाच्या धावपळीत ती तिचा लॅपटॉप व इतर साहित्य तिथेच सोडून आल्याने तिने मुंबईत आल्यावर भाषांतराला नव्याने सुरुवात केली. या पुस्तकाचा अनुवाद आधी मी हाताने लिहून काढला, नंतर तो टाईप केला. या पुस्तकासाठी तिला वडील प्रभाकर, आई पूजा, बहीण हर्षदा यांनी संदर्भ शोधण्यासाठी तर चीनमधील स्नेहल, अजित, उलमन यांनी व्याकरणासाठी मदत केल्याचे रसिकाने दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. या पुस्तकाचे मुखपृष्ठ व चित्रे ऋत्विज कापसे यांनी रेखाटली आहेत. रसिका ही अनाम प्रेम या सामाजिक संस्थेची कार्यकर्तीही आहे.
मी चीनमध्ये आजारी असताना तिथल्या स्त्री शिक्षकांनी माझ्या आईसारखी माझी काळजी घेतली, मला त्या देशात एकटे पडू दिले नाही, हेच पुस्तक अनुवादासाठी प्रथम घेण्याचे हेही एक कारण असल्याचे रसिका पावसकर हिने नमूद केले.
चीनमध्ये भारतातील रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद यांचे साहित्य शिकवले जाते. १९३० मध्ये प्रकाशित झालेल्या 'श्यामची आई' पुस्तकाच्या आवृत्त्या आहेत. त्यात सर्व भावनांचे दर्शन, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. त्यामुळे या पुस्तकातील सांस्कृतिक संकल्पनांचे संदर्भ, अर्थ चिनी भाषेत भाषांतरित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. हे पुस्तक २५० पानांचे असून येत्या २९ जानेवारी रोजी या पुस्तकाचे प्रकाशन पु. ल. देशपांडे कला अकादमीत होत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे आता सदरील अनुवादित होणाऱ्या श्यामची आई पुस्तकामुळे चिनी नागरिकांना भारतीय संस्कृतीची ओळख होणार असून त्यांना या पुस्तकाचा चांगला लाभ होणार आहे.