Latest

Shubman Gill vs MS Dhoni : गिल नंबर-1 बनला, पण धोनीच्या मागेच राहिला

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubman Gill vs MS Dhoni : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुबमन गिल याने आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची राजवट संपुष्टात आणली आहे. बाबर हा गेल्या 950 दिवसांपासून क्रमांक-1 चा फलंदाज राहिला. पण आता गिलने आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर अव्वल स्थानी झेप घेतली आहे. मात्र, नंबर-1 रँकिंग गाठून सुद्धा गिलला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला एका विशिष्ट बाबतीत मागे टाकता आले नाही.

टॉप-10 मध्ये तीन भारतीय फलंदाजांचा समावेश (Shubman Gill vs MS Dhoni)

आयसीसी विश्वचषक 2023 सुरू होण्यापूर्वीच गिल आणि बाबर यांच्यातील रेटिंग गुणांचे अंतर लक्षणीयरीत्या कमी झाले होते. तथापि, सध्याही यात फारसा फरक नाहीय. गिलचे 830 रेटिंग गुण आहेत, तर बाबरचे 824 रेटिंग गुण आहेत. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीलाही ताज्या क्रमवारीत फायदा झाला असून तो टॉप-5 मध्ये परतला आहे. विराट 770 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे. अशा प्रकारे, तीन भारतीय फलंदाजांचा टॉप-10 एकदिवसीय फलंदाजांमध्ये समावेश झाला आहे.

41 डावांनंतर गिल पहिल्या स्थानी (Shubman Gill vs MS Dhoni)

धोनी सुरुवातीच्या 38 डावातच नंबर-1 एकदिवसीय फलंदाज बनला होता, परंतु गिलला हे स्थान मिळवण्यासाठी 41 डाव खेळावे लागले आहेत. याशिवाय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत नंबर-1 स्थान मिळवणारा गिल हा केवळ चौथा भारतीय फलंदाज आहे. त्याच्या आधी हा पराक्रम सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी केला आहे. गिलने यावर्षी आतापर्यंत 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 63 च्या सरासरीने एकूण 1449 धावा केल्या आहेत, ज्यात पाच शतके आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट 103.72 इतका राहिला आहे. या वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या तीन फलंदाजांमध्ये तो आघाडीवर आहे. तर एकूण 41 सामन्यांच्या 41 डावांमध्ये गिलने 61.02 च्या सरासरीने एकूण 2136 धावा केल्या आहेत.

गिलची वर्ल्डकपमधील कामगिरी ()

गिलने सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात 6 डावात 36.50 च्या सरासरीने 219 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. श्रीलंकेविरुद्ध 92 तर बांगलादेश विरुद्ध 53 धावांची इनिंग खेळली आहे. तर दुसरीकडे बाबर आझमने विश्वचषकातील 8 डावात 282 धावा केल्या आहेत. (Shubman Gill vs MS Dhoni)

मोहम्मद शमीची मोठी झेप

भारतीय क्रिकेट संघ आयसीसी विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. गिलला नंबर-1 स्थानावर आपली पकड मजबूत करायची आहे आणि त्यासाठी त्याला बाद फेरीत दमदार कामगिरी करावी लागणार आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज पुन्हा एकदा आयसीसी वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. कुलदीप यादव चौथ्या, तर जसप्रीत बुमराह आठव्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमीनेही मोठी झेप घेत 10व्या स्थान मिळवले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT