Latest

IPL Auction: लिलावाचे सूत्रसंचालन करणारे ह्यूग एडमिड्स पडले बेशुद्ध!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Auction : IPL लिलावादरम्यान दुपारी 2.15 वाजता एक मोठी घटना घडली. लिलावाच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारे ह्यूग एडमिड्स अचानक भोवळ येऊन जागीच कोसळले. त्यानंतर लिलाव थांबवण्यात आला. मूळचे ब्रिटनचा असलेला ह्यूग यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. अहवालानुसार, ह्यूग यांची प्रकृती ठीक असून ते पुन्हा लिलाव प्रक्रियेत सहभागी होतील असे सांगण्यात आले आहे.

श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू होती. फ्रँचायझी संघांनी त्याच्यावरची बोली 10 कोटींच्या पुढे नेली होती. अचानक लिलाव करत असलेले ह्यूग एडमिड्स स्टेजवर कोसळले. ते बेशुद्ध पडले असल्याचे समजताच सर्वजण हैराण आणि काळजीत पडले. वैद्यकीय पथकाला पाचारण करून लिलाव तत्काळ थांबविण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. आता दुपारी 3.30 वाजता पुन्हा लिलाव सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ब्रिटन येथील ह्यूग यांनी 2500 लिलाव केले आहेत…

ब्रिटनमधून आलेले ह्यूग हे ललित कला, क्लासिक आणि चॅरिटीसाठी लिलाव तज्ञ आहेत. ते गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ लिलाव कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत आहेत. आतापर्यंत त्यांनी जगभरात 2500 हून अधिक लिलाव केले आहेत. त्यांनी लिलावासाठी दुबई, हाँगकाँग, कॅसाब्लांका, न्यूयॉर्क, मुंबई, मॉन्टे कार्लो, लॉस एंजेलिस आणि टोकियो यासह ३० हून अधिक शहरांना भेटी दिल्या आहेत.

ह्यूग एडमिड्स पहिल्यांदा 2019 मध्ये आयपीएल लिलावासाठी उपस्थित होते. त्यांच्यापूर्वी वेल्स येथील रिचर्ड मॅडली हे IPL लिलावाचे सूत्रसंचालन करत होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की ह्यूग एडमिड्स पुन्हा एकदा लिलावाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. अरुण धुमाळ म्हणाले होते की, एडमिड्स यांनी लिलावकर्ता म्हणून उत्तम काम केले आहे. ते पहिल्यांदाच मेगा लिलावात बोली लावण्यासाठी आले आहेत. त्यांच्या आधी रिचर्ड मॅडली लिलावाचे सूत्रसंचालन करत होते. 2019 मध्ये जेव्हा त्यांना डच्चू देण्यात आला तेव्हा मॅडली यांनी निराशा व्यक्त केली होती.

लिलावापूर्वी एडमिड्स यांनी एका क्रिकेट विषयक वेबसाईटला मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, 'मी इतक्या मोठ्या लिलावामध्ये कधीच सहभागी झालेलो नाही. आयपीएलचा लिलाव बराच काळ चालतो. लिलावासाठी माझ्या आत कुठून उर्जा येते हे मला माहीत नाही. दोन दिवसांच्या लिलावानंतर, 14 फेब्रुवारीला लंडनला परतताना माझी झोप चांगली होईल.'

तत्पूर्वी, श्रेयस अय्यर हा आयपीएल मेगा लिलावात आतापर्यंतचा सर्वात महागडा विकणारा खेळाडू ठरला. अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने १२.२५ कोटींना विकत घेतले आहे. यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. या लिलावात श्रेयस पहिला १० कोटी मनसबदार बनला. लिलावात आतापर्यंतचा सर्वात मोठा फायदा आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसचा झाला आहे, ज्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ कोटींमध्ये विकत घेतले आहे. त्यांचे मूल्य ३३७ टक्क्यांनी वाढले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT