Latest

नव्या वर्षात राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा ‘शॉक’

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : नव्या वर्षाच्या स्वागतात राज्यातील जनता मग्न असताना राज्य सरकारने राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा 'शॉक' दिला आहे. नव्या वर्षात घरगुती वीज ग्राहकांवर दरमहा 10 ते 65 रुपयांचा वीज दरवाढीचा बोजा वाढणार आहे.

राज्यातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय वीज ग्राहकांसाठी ही दरवाढ दरमहा 25 ते 45 रुपये असणार आहे. शेती पंपासाठी ही दरवाढ 20 ते 30 पैसे प्रतियुनिट असणार आहे. उच्च दाब श्रेणीतील औद्योगिक ग्राहकांसाठी ही दरवाढ 35 पैसे प्रतियुनिट तर व्यावसायिक ग्राहकांना 55 पैसे असणार आहे.

गृहनिर्माण सोसायटीच्या वीज बिलांमध्ये 30 पैसे प्रतियुनिट वाढ होणार आहे. कोळसा खरेदीसाठी अपेक्षित खर्चापेक्षा अधिक खर्च येत असल्याने इंधन समायोजन शुल्क या शीर्षकाखाली ही दरवाढ करण्यात येत आहे, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले. इंधन खरेदीसाठी दरमहा 386 कोटी अधिक खर्च येत असल्याने या खर्चाची भरपाई वीज बिल वाढवून करण्याचा प्रस्ताव महावितरणतर्फे राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिल्याने डिसेंबर महिन्याच्या वीज बिलापासूनच ही दरवाढ करण्यात येत आहे, अशी घोषणा करण्यात आली आहे.

ग्राहकांवर सातत्यानेे वाढता भार

इंधन अधिभार वाढीच्या नावाखाली ही दरवाढ राज्यातील वीज ग्राहकांवर लादली जात आहे. एप्रिल महिन्यातच राज्यात नवे वीज दर लागू करण्यात आले होते तेव्हाही वीज दरवाढ झाली होती. राज्य वीज नियामक आयोगाने आदेशानुसार 2023-24 आर्थिक वर्षात 3 टक्के तर 24-25 या वर्षात सुमारे 6 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. 28 डिसेंबर रोजी महावितरणने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता या दरवाढीत इंधन अधिभारामुळे होणार्‍या दरवाढीची भर घातली जाईल.

SCROLL FOR NEXT