Latest

Shivsena MLA Disqualification : आमदार अपात्रताप्रकरणी ५३ आमदारांना नोटिसा; आजपासून सुनावणी

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आमदार अपात्रता याचिकांवर आठवडाभरात सुनावणी घेत वेळापत्रक निश्चित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी विधान भवनात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होत आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होईल.

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ३९ तर ठाकरे गटाच्या १४ अशा एकूण ५३ आमदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी पहिली सुनावणी घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविल्यानंतर सुमारे पाच महिन्यांनंतर १४ सप्टेंबर रोजी पहिली सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या याचिका मिळाल्या नसल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. त्यामुळे कागदपत्रे एकमेकांना सुपूर्द करण्यासाठी तसेच या याचिकांच्या अभ्यासासाठी वेळ देत अध्यक्षांनी पुढील सुनावणीची तारीख १७ दिवसानंतरची निश्चित केली होती. मात्र दरम्यानच्या काळात तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी लवादाप्रमाणे कार्यवाही करावी. आठवडाभरात सुनावणी घेत दोन आठवड्यांत सुनावणीची पुढील रूपरेषा, कार्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोमवारी विधान भवनात तातडीने सुनावणीला सुरुवात होणार आहे.

संजय राऊतांवर हक्कभंग आणणार : आ. नितेश राणे

ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी नोटिसा मिळाल्या असून आम्ही आमच्या वकिलांसह या सुनावणीसाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सुनावणीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरे गटाचे नेते खालच्या पातळीची टीका करत आहेत. त्यांना धमक्या देत आहेत. दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे संजय राऊत आणि इतर नेत्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी रविवारी दिला.

विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो नियमाच्या कायद्याच्या चौकटीत असेल, असेही राणे म्हणाले. तसेच ठाकरे गटाला राहुल नार्वेकर चुकीचे वाटत आहेत. पण, यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या मुलाला कायदा शिकविण्यासाठी नार्वेकर यांच्याजवळ पाठवले होते, अशी आठवण करून देत राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

वकिलांमार्फत बाजू मांडली जाणार

पहिल्या सुनावणीप्रमाणे दोन्ही गटाचे आमदार आपल्या दोन-दोन वकिलांसह उपस्थित राहणार आहेत. निलंबनाच्या याचिकांवर एकत्र सुनावणीचा ठाकरे गटाचा आग्रह असणार आहे. त्यासाठी जून २०२२ ला अस्तित्वात असलेला पक्ष आणि प्रतोद हा मुद्दा तसेच यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाकडून पुढे केला जाण्याची शक्यता आहे. तर आपणच शिवसेना असून निवडणूक आयोगानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याची शिंदे गटाची भूमिका असेल. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने पक्ष कोणाचा याचा निर्णयही अध्यक्षांना करायला सांगितल्याने अपात्रतेआधी पक्ष कुणाचा, यावरच अध्यक्षांचा भर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज रूपरेषा ठरण्याची शक्यता

• लवादाप्रमाणे सुनावणी घ्यावी आणि त्याची रूपरेषा निश्चित करून त्याबाबत आम्हाला अवगत करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सोमवारच्या सुनावणीत आमदार अपात्रता याचिकांवरील कार्यवाहीची रूपरेषा निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

• सुरुवातीला १६ आणि त्यानंतर २४ आमदारांच्या निलंबनासाठी केलेल्या याचिकांचा विषय एकच असल्याने दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. तर, शिंदे गटाने त्यावर हरकत घेतली होती. आजच्या सुनावणीत या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आवश्यक तेवढा वेळ घेणार : नार्वेकर

घटनात्मक तरतुदी, अपात्रतेसंदर्भातील विधानसभेचे नियम यांचा विचार करूनच निर्णय घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखतच सुनावणी होणार आहे. मात्र, घाईघाईत निकाल लावला जाणार नाही. घाई केली किंवा सर्व नियमांचे पालन करायचे म्हटले तरी आरोप होणार आहेत. या आरोपांचा सुनावणीवर परिणाम होऊ देणार नाही. संविधानातील सर्व तरतुदींनुसार न्याय केला जाणार आहे. त्यासाठी जितका अवधी लागेल तितका घेतला जाईल. त्यापासून कोणतीही संस्था रोखू शकणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT