Latest

विधानसभेतील यशानंतर आता शिवराजसिंह चौहान यांचे ‘मिशन 29’

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी आज (दि. ६) पुढील संकल्‍प जाहीर केला. छिंदवाडा येथील जाहीर सभेत त्‍यांनी मध्य प्रदेशातील लोकसभेच्‍या सर्व २९ जागा जिंकणार (Mission 29) असल्‍याचा संकल्‍प असल्‍याचे सांगितले.

विधानसभा निवडणूक निकालानंतर आज छिंदवाडा येथे जाहीर सभेत बोलताना शिवराज सिंह चौहान म्‍हणाले की, "विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी छिंदवाड्यात माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होतो. इथे आल्यावर मला एवढा सन्मान मिळेल, अशी अपेक्षाही केली नव्हती. येथे माझ्‍या बहिणींनी आमचा भाऊ जिंकला, असे सांगितले. भव्य विजय मी माझ्या बहिणींना आणि राज्यातील जनतेला समर्पित करतो,"

शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करत राहीन

मी मध्‍य प्रदेशच्‍या विकासाची हमी देण्‍याचे वचन देतो. माझ्‍या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवा करत राहीन, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशासाठी वरदान आहेत. आपण आपल्या देशाला 'विश्वगुरु' बनवू. काँग्रेस राममंदिरावर प्रश्न उपस्थित करत होती; पण आता त्याचे उद्घाटन होणार आहे. आम्ही प्रत्येक हमी पूर्ण करण्याचे वचन देतो. प्रत्येक कुटुंबाला रोजगार देण्याचे वचन आम्हाला पूर्ण करायचे आहे. माझ्या बहिणींना दिलेले वचन आम्हाला पूर्ण करायचे आहे", असेही त्‍यांनी सांगितले.

 Mission 29 : आजपासून एक नवीन मिशन सुरु

भाजपच्या दिग्गज नेत्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील सर्व 29 जागा भाजपला देण्याचे वचन दिले. 2019 मध्ये भाजपने 29 पैकी 28 जागा जिंकल्या होत्या. मी शिवराजसिंह चौहान आहे. मी तुमच्या प्रगतीची हमी देतो. आजपासून आम्ही एक नवीन मिशन सुरू करतो. या मिशनचे नाव आहे मिशन 29, मध्य प्रदेशातील सर्व 29 जागा जिंकण्यासाठी. लोकसभेच्या राज्यातील सर्व 29 जागांवर 'कमळ' फुलवण्याचा आमचा संकल्प आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत.त्यासाठी भाजपचे आपण सर्व समर्पित आणि निष्ठावान कार्यकर्ते पूर्ण झोकून देऊन संघटन मजबूत करू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना '२९ कमळांची' माळ नक्कीच अर्पण करू, असा विश्‍वासही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT