Latest

शिवरायांच्या वाघनखांवरून राजकीय रणकंदन

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनच्या वस्तुसंग्रहालयातील वाघनखे परत आणण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. ही वाघनखे शिवाजी महाराजांचीच आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना लक्ष्य केले आहे. या गदारोळातच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वाघनखांबाबत करार करण्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत.

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून वाघनखे तसेच शिवरायांशी संबंधित अन्य वस्तू भारतात आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विभाग प्रयत्नशील आहे.

संबंधित वस्तुसंग्रहालयासोबत करारासाठी मंत्री मुनगंटीवार यांच्यासह विभागाचे पथक रविवारी रात्री लंडनला रवाना झाले. 3 ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील करार होणार आहे. मात्र या वाघनखांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र वार-प्रतिवार सुरू झाले आहेत. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत का, असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. वाघनखे खरी असतील तर पुरावे द्या, सरकारने सत्य लोकांसमोर स्पष्ट करावे, असे आव्हान देत ठाकरे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनीही सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले. तर वाघनखे खोटी आहेत हे सिद्धच करा, असे प्रतिआव्हान शिवरायांचे वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहे.

दरम्यान, ही वाघनखे साधारण तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ती कायमस्वरूपी भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ब्रिटिशांना वाघांची एक जोडी देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. याबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. रविवारी रात्री लंडनला रवाना होण्यापूर्वी मुनगंटीवार यांनी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

वाघनखांवरून वाद नको : शरद पवार

शिवरायांच्या वाघनखांवरून वाद निर्माण करावा असे मला वाटत नाही. मराठी भाषेतील इतिहासाचे जाणकार इंद्रजित सावंत आहेत. त्यांचे काही मत असेल तर त्यांचा विचार केला पाहिजे. पण वाघनखांविषयी मला प्रत्यक्ष काहीही माहिती नाही, असे राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी म्हटले आहे.

बालबुद्धीला उत्तर देत नाही : देवेंद्र फडणवीस

संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडेच पुरावे मागितले होते. त्यामुळे मला मला याचे आश्चर्य वाटत नाही. ती त्यांची परंपरा आहे. मी बालबुद्धीला उत्तर देत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना फटकारले आहे.

जनतेच्या भावनांशी खेळू नका : आदित्य ठाकरे

शिवरायांशी संबंधित महत्त्वाची वस्तू महाराष्ट्रात येत असेल तर त्याचे मंदिर व्हावे आणि त्याचे जतन व्हावे, अशी शिवभक्तांची भावना आहे. मात्र सरकारने जनतेच्या भावनांशी खेळू नये. वाघनखे खरी असतील तर पुरावे द्या, असे आव्हान ठाकरे गटाचे नेते आ. आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

वाघनखे खोटी असल्याचे हे आदित्य ठाकरे यांनी सिद्ध करावे : शिवेंद्रसिंहराजे भोसले

वाघनखे खरी आहेत का हे विचारण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांनी ती खोटी आहेत हे सिद्ध करून दाखवावे. ज्या गोष्टींशी मराठी माणसांची अस्मिता जोडली गेली आहे, त्याचे राजकारण न करता वाघनखांचे पूजन करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले

SCROLL FOR NEXT