Latest

महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्राईम रेट ठाणे-कल्याणमध्येच : सुषमा अंधारे

अनुराधा कोरवी

ठाणे : पुढारी वृत्तसेवा ;  या सरकारने महाराष्ट्राची सूत्रे हातात घेतली आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर सर्वात जास्त क्राईम रेट हा ठाणे आणि कल्याण या भागात असल्याची आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाण्यात केला आहे. दुसरीकडे राज्यात ज्या खोट्या केसेस दाखल केल्या जात आहे त्या निष्ठावंत शिवसैनिकांवर टाकले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अंधारे यांनी नितेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली.

मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेच्या निमित्ताने अंधारे ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी नागरिकांशी देखील संवाद साधला.यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरही टीका केली. या सरकारच्या गुन्हेगारीला आता सर्वच जण त्रस्त झाले असून या सर्वाना नागरिकच धडा शिकवतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सरकारचा शासन आपल्या दारी हा निव्वळ भुरटेपणा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

जिल्ह्यात महिलांना घरे मिळालेली नाही, अनेकापर्यंत योजनाच पोहचलेल्या नाहीत, अनेक गांवामध्ये रस्ते, वीज, पाणी नाही त्यामुळे शासन आपल्या दारी करदात्यांच्या पैशांची लुट असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. बारामतीमधील शासन आपल्या दारीच्या कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांना डावललेल्या असल्याच्या मुद्यावर त्यांना विचारले असता, त्यासाठी मोठेपणा असावा लागतो असे देखील अंधारे यांनी मत व्यक्त केले.मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना कोणी निवडून दिले.आमदार प्रकाश सुर्वे यांनी आम्ही निवडून दिले. उदय सामंतांना मंत्री कोणी बनविले.

त्यामुळे आम्ही तुम्हाला घडवू शकतो तर खाली सुध्दा उतरवू शकतो असा इशाराही सुषमा अंधारे यांनी यावेळी दिला. या सत्ताधार्‍यांना नागरिक वैतागले आहेत. महागाई, भ्रष्टाचार, गुन्हेगारीवर कोणी बोलत नाही, उलट ठाण्यासह इतर ठिकाणी गुंडगिरी, गुन्हेगारी वाढत असल्याचे अंधारे यांनी बोलताना सांगितले.

नितेश राणे यांच्या वक्तव्यावर पोलीस काहीच बोलत नाही, देवेंद्र फडणवीसही काही करू शकले नाही, त्याचा परिणाम दिवसा ढवळ्या पोलीस ठाण्यातच लोकं गोळ्या झाडू लागले आहेत अशी टीकाही यावेळी केली. मध्यंतरी आदित्य ठाकरे आले आणि दुसर्‍या दिवशी काही लोकांना मळमळ झाली आहे . सध्या रामाचा बोलबाला आहे . मात्र राम त्यांना कळाला असता तर त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या नसत्या.ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्यांना उप मुख्यमंत्री केले ही मोदीची गॅरंटी असल्याची टीकाही त्यांनी केली. , रमाचे अनुयायी खर्‍या अर्थाने ठाकरे असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला नसून हा निष्ठावंत शिवैसनिकांचा बालेकिल्ला आहे , योगा योगाने शिंद इथे असल्याचा टोला अंधारे यांनी यावेळी लगावला.

म्हस्के यांना 24 तास बॉडीगार्ड लागतात

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा देखील अंधारे यांनी चांगलाच खरपुस समाचार घेतला. म्हस्के यांना 24 तास बॉडीगार्ड लागतात, त्यात त्यांच्यावर बोलण्याइतके ते इतके काही मोठे झालेले नाहीत. केवळ त्यांच्यावर वरदहस्त असल्यानेच ते बोलत असून त्यांच्या डोक्यावरील हात काढला तर आमचा साधा रिक्षावाला देखील त्यांना त्यांची जागा दाखवून देईल अशी टिका अंधारे यांनी यावेळी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT