ठाणे, पुढारी वृत्तसेवा : एका चिठ्ठीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गडकरी नाट्यगृह दिले; पण आता त्याच ठाण्यात वेगळेच लोक नाटक करीत आहेत. खरी शिवसेना ही आमचीच असून त्या गद्दारांची सेना ही चायनीज मालाप्रमाणे बोगस आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शनिवारी ठाण्यातच चढवला.
ठाण्याच्या गडकरी रंगायनमध्ये खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या हिंदी भाषिक संमेलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण सभागृह भरून बाहेर रस्त्यावर लोकांनी गर्दी केली होती. ही गर्दी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धाबे दणाणले असतील, अशी सुरुवात करत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि ठाणेकरांच्या नात्याची सर्वांना आठवण करून दिली. ते म्हणाले, माझी हिंदी समजेल ना? मराठीतून भाषण करू का? तेव्हा कुठल्याही भाषेतून बोला आम्हाला समजणार असे उत्तर सभागृहातून येताच ठाकरे म्हणाले, हेच खरे हिंदुत्व! तुमचे हिंदुत्व हे नकली असून आमचीच खरी शिवसेना आहे. त्यांची शिवसेना ही चायनीज मालाप्रमाणे बोगस, गद्दार आहे. पन्नास खोक्यातून जन्म घेतलेले सरकार जनतेला काय न्याय देणार? या कठीण परीक्षेच्या काळात त्यांना उत्तर भारतीयच उत्तर देतील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची ट्रेन सुटली, तर भारतमाता ही हुकूमशहाच्या ताब्यात जाईल. ती पुन्हा गुलाम होईल. त्यामुळे हिंदी भाषिकांनी शिवसेना आणि वज्रमूठ असलेल्या 'इंडिया' सोबत राहण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
भ्रष्टाचाराचे आरोप करून राष्ट्रवादी तोडली आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून पंतप्रधान मोदी हे सत्कार स्वीकारणार आहेत, यावर टीकास्त्र सोडत ठाकरे म्हणाले, भाजपच्या हिंदुत्वाचा मुखवटा टराटरा फाटला असून देशप्रेमींची एकजूट असलेल्या इंडियाला इंडियन मुजाहिद्दीन असे संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा अपमान केला आहे. त्याच इंडियाचे तुम्ही प्रधानसेवक म्हणून जगात फिरता म्हणजे तुम्हाला इंडियन मुजाहिद्दिनचे प्रधानसेवक म्हणून बोलायचे का? मणिपूरमधील हिंसा आणि महिलांच्या अपमानाबाबत आदिवासी महिला असलेल्या राष्ट्रपती, महिला राज्यपाल काही बोलत नाहीत. त्यांना संवेदना नाही का, असा सवाल उद्धव यांनी केला. गृहमंत्री अमित शहा यांना दुसर्यांदा मणिपूरला पाठवून दंगेखोरांना भाजपात घ्यावे, म्हणजे दंगल संपेल, असाही टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला.
हिंदुस्थानचा अपमान
खोक्यातून निर्माण झालेले सरकार आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात कुठलेही योगदान नसलेल्या भाजपने 'इंडिया' आघाडीला अतिरेकी संबोधून हिंदुस्थानचा अपमान केला आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.