जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सामील झालेल्या शिवसेनेच्या आमदारांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करून लागले आहेत. कोल्हापुरातील शिरोळमधून अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. यड्रावकर शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जयसिंगपूर येथील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी निदर्शने केली. यावेळी यड्रावकरांचे समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला.
यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. मंत्री यड्रावकर यांचे समर्थक एकटवले आहेत. आम्ही यड्रावकर म्हणून हजारो समर्थक त्यांच्या कार्यालयासमोर जमले आहेत. या सर्व समर्थकांनी शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. यड्रावकरांच्या कार्यालयासमोर मोठा पाेलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलिसांनी लावलेले बॅरिकेट काढून टाकत आक्रमक शिवसैनिक कार्यालयात घुसले. यड्रावकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये व शिवसैनिकांमध्ये मोठी झटापट झाली. यड्रावकर यांच्या नावाचा बोर्ड शिवसैनिकांनी काढून टाकल्याने मोठा तणाव निर्माण झालेला आहे. जयसिंगपूर येथे तणावपूर्ण वातावरण तयार झालेले आहे. दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने पोलीस कुमक कमी पडल्याचे दिसून आले.