Latest

Shiv Jayanti 2024 : शिवाजी तरुण मंडळाची शिवजयंती मिरवणूक उत्साहात

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'जय भवानी, जय शिवाजी'चा अखंड जयघोष… कडाडणारी हलगी… कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह आणि चित्तथरारक मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके अशा शिवमय वातावरणात सोमवारी शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली. दरवर्षी 19 फेब्रुवारी या तारखेनुसारच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा पायंडा शिवाजी तरुण मंडळाने कायम राखला असून यावेळी आबालवृद्धांचा सहभाग होता. यामध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय होती. (Shiv Jayanti 2024)

प्रबोधनात्मक व चालू घडामोडीवर भाष्य करणारे फलक लावून मिरवणूक लक्षवेधी करण्याचा प्रयत्न शिवाजी तरुण मंडळाकडून केला जातो. या मिरवणुकीत छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत अनेक लहान मुले सहभागी झाली होती. मिरवणुकीत घोडे, उंट आदींसह लवाजमा सहभागी होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उभा मारुती चौकातून शाहू महाराज, आमदार ऋतुराज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसाग, माजी आमदार चंद्रदीप नरके, मधुरिमाराजे, यशराजे, शहाजीराजे यांच्यासह शिवाजी पेठेतील मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात झाली. (Shiv Jayanti 2024)

'जय शिवाजी, जय भवानी'चा नारा देत हजारो तरुण कार्यकर्ते मिरवणुकीत अग्रभागी होते. कोल्हापुरी फेटे परिधान केलेल्या महिला आणि मुलींनी या मिरवणुकीत लक्षणीय सहभाग नोंदवला. मिरवणूक उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, मिरजकर तिकटीमार्गे पुन्हा शिवाजी पेठेत नेण्यात आली.

मिरवणुकीत अध्यक्ष सुजित चव्हाण, उत्सव समिती अध्यक्ष राहुल जरग, संजय कुर्‍हाडे, अजित खराडे, केशव जाधव, पंडितराव बोंद्रे, रविकिरण इंगवले मोहन साळोखे, सुहास साळोखे आदींसह असंख्य कार्यकर्ते सक्रिय होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT