Latest

कोल्हापूरच्या 6 मुलींना शिवछत्रपती पुरस्कार

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रणरागिणी ताराराणींचा वारसा जपत कोल्हापूरच्या सहा मुलींनी क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार पटकावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे देण्यात येणार्‍या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यात क्रीडानगरी कोल्हापुरातील सहा महिला खेळाडूंना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात कुस्ती, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, नेमबाजी, सॉफ्टबॉल, बॅडमिंटन या सहा खेळांतील महिला खेळाडूंचा समावेश आहे.

सन 2019-20 मधील वेटलिफ्टिंग खेळासाठीचा पुरस्कार अश्विनी मळगे (इचलकरंजी) हिला, तर बॅडमिंटन खेळासाठी दिव्यांग खेळाडू
आरती पाटील (उचगाव, ता. करवीर) हिला पुरस्कार जाहीर झाला आहे. सन 2020-21 साठीचे शिवछत्रपती पुरस्कार पॉवरलिफ्टिंग – सोनल सावंत (दिंडनेर्ली, ता. करवीर), कुस्ती – स्वाती शिंदे (मुरगूड, ता. कागल), नेमबाजी – अभिज्ञा पाटील (पेठवडगाव, ता. हातकणंगले), सॉफ्टबॉल – स्वप्नाली वायदंडे (गडमुडशिंगी, ता. करवीर) या चौघींना जाहीर झाले आहेत.

दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती विविध माध्यमांकडून खेळाडूंना कळताच खेळाडूंच्या घरांसह गावांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. खेळाडूंच्या नातेवाईकांसह क्रीडाप्रेमींनी खेळाडूंना प्रत्यक्ष भेटून, फोनवरून आणि सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. त्यांना घडविणारे प्रशिक्षक, पालक यांचेही आवर्जून अभिनंदन करण्यात आले. साखर-पेढे वाटून आणि फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

इतर जिल्ह्यांकडून खेळणार्‍या दोघांना पुरस्कार

नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात स्थायिक झालेल्या; पण मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोघा खेळाडूंनाही शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. यात पुण्याकडून खेळणार्‍या सोनबा गोंगाणे याला कुस्तीसाठी, तर रत्नागिरीकडून खेळणार्‍या अपेक्षा सुतार हिला खो-खो खेळासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

SCROLL FOR NEXT