Latest

शिर्डी : साईचरणी 10 दिवसांत 16 कोटींचे दान!

Arun Patil

शिर्डी, पुढारी वृत्तसेवा : साईभक्तांनी नाताळ, सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना अवघ्या 10 दिवसांत जवळपास 16 कोटींचे दान साईचरणी अर्पण केले आहे. साईबाबा संस्थानाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी ही माहिती दिली.

नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित शिर्डी महोत्सवाच्या काळात म्हणजे 23 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 या 10 दिवसांत सुमारे 8 लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या कालावधीत सुमारे 15.95 कोटी रुपये देणगी प्राप्त झाली आहे. या कालावधीत साई प्रसादालयात सहा लाखांहून अधिक साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा आणि सुमारे सव्वा लाखाहून अधिक साईभक्तांनी अन्न पाकिटांचा आणि 7 लाख 46 हजार 400 साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.

याबरोबरच 11 लाख 10 हजार 600 लाडू प्रसादाच्या पाकिटांची विक्री करण्यात आली. त्याद्वारे 1 कोटी 41 लाख 55 हजार 500 रुपये प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय, श्री साई प्रसादालय मोफत भोजन, संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्यरुग्णांना चॅरिटीकरिता, साईभक्तांच्या सुविधांकरिता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामांकरिता करण्यात येत असल्याचे हुलवळे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT