Latest

अजित पवारांची दांडी, मंत्रिमंडळ विस्ताराचा ‘दांडिया’

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मंत्रीमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारल्याने पवारांची नाराजी टोकाला पोहोचल्याची चर्चा आहे. पवारांच्या दांडीने आता नवरात्रात मंत्रीमंडळ विस्तार आणि पालकमंत्री पद वाटपाचा 'दांडिया' येत्या नवरात्रात खेळण्याशिवाय पर्याय नसल्याचे आता भाजप शिवसेनेला कळले आहे.

ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी रात्रीच नवी दिल्ली गाठल्याने मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींनी अखेर आता गती पकडल्याने लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाच दिवसांच्या सुट्टीनंतर मंत्रालय मंगळवारी सुरु झाले असताना मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली.
इतर मंत्र्यांच्या तुलनेने मंत्रालयात अधिक दिवस हजर राहणारे अजित पवार हे मुंबईत शासकीय निवासस्थान 'देवगिरी'वर उपस्थित असूनही मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीला आले नाहीत.

मंत्रालयात दुपारी 12 वाजता मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पावणे बाराच्या सुमारास सर्वच मंत्री बैठकीला आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बैठकीला आले होते. मात्र, अजित पवार दिसत नसल्यामुळे उपस्थित मंत्र्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. एखाद्या कार्यक्रमाला अजित पवार उशिराने जातात. त्यानुसार आजही ते उशिरा येतील, असा शिंदे गट आणि भाजपाच्या मंत्र्यांनी अंदाज बांधला होता. बैठक सुरु झाली तरीही अजित पवार आले नाहीत. यामुळे एखाद्या विषयावरून ते नाराज तर नाही ना, अशी कुजबुज सुरु झाली. शेवटी सात विषयांवर चर्चा करून बैठक आटोपती घेण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्या गटाच्या सर्व मंत्र्यांनी बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. पवारांच्या अनुपस्थितीमुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी पक्षाकडून उपमुख्यमंत्री पवार यांची तब्येत ठीक नसल्याचा दावा करण्यात आला. परंतु, ते नियोजित कार्यक्रमानुसार पक्षाचे नेते आणि इतर व्यक्तींना 'देवगिरी'वर भेटत होते. यापूर्वीही केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे मुंबईत आले असताना पवारांनी त्यांच्या दौ-यांकडे पाठ फिरविली. त्यानंतर गणेश दर्शनाला मुंख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी जाणे त्यांनी टाळले. या सर्वांमुळेच पवार नाराज असल्याचे स्पष्ट झाले असतानाच आज त्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरविल्याने त्यांनी भाजप-शिवसेनेला एकप्रकारे इशारा दिल्याचे मानले जात आहे.

पवारांच्या नाराजीचे कारण

पवारांच्या नाराजीमागे पालकमंत्री पद हे महत्वाचे कारण आहे. राष्ट्रवादीतील 9 मंत्र्यांच्या समावेशापूर्वीच पालकमंत्र्यांना जिल्हा वाटप झाले आहे. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीचा समावेश होण्यापूर्वी राज्य मंत्रीमंडळात 20 मंत्री होते. राज्यातील 36 जिल्हे या मंत्र्यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वाटून देण्यात आल्याने काही मंत्र्यांकडे पाच ते सहा जिल्हेही आहेत. राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर अद्याप नव्याने पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. पवारांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे आहे. भाजपलाही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडायचे नाही. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे असून भाजपही हा जिल्हा सोडायला तयार नाही. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांना मिळावे असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद हवे आहे. ते सध्या मंत्री नसल्याने पालकमंत्री होऊ शकत नसले तरी कोणत्याही परिस्थितीत या जिल्ह्याचे पालकमंत्री पद तटकरे यांना द्यायला शिवसेना तयार नाही. मंत्रीमंडळात 13 जागा रिक्त आहेत. या जागा भरल्याशिवाय पालक मंत्री पदावरही तोडगा निघणार नाही. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने पालक मंत्री पद नसेल तर आपल्या प्रभाव क्षेत्रात पक्षाची कामगिरी सुधारणे अवघड जाईल यासाठी अजित पवारांनी दबाव वाढविला आहे.

गंगेत घोडे न्हाणार

सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील मंत्री पदासाठी इच्छूक आमदार विस्तारासाठी दबाव वाढवूनही अखेर थकले. त्यांच्या दबावाला दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी भीक घालणेही केव्हाचे बंद केले. या पार्श्वभूमीवर किमान अजित दादांच्या काठीने मंत्रीमंडळ विस्तार दिरंगाईचा साप ठेटला जाईल आणि आपलेही घोडे गंगेत न्हाणार म्हणून भाजप-शिवसेनेच्या आमदारांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT