Latest

Pak New PM : मोठा भाऊ ‘नवाझ’नंतर लहान भाऊ ‘शाहबाज’ पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pak New PM : पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली असताना आज (दि. ११) पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड करण्यात आली आहे. नॅशनल असेंब्लीमध्ये नवीन पंतप्रधान निवडीदरम्यान, इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या सर्व खासदारांनी वॉकआउट करत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. आज इम्रान खान यांचे निकटवर्तीय फवाद चौधरी यांनीही त्यांच्या पक्षाचे सर्व खासदार एकत्रितपणे राजीनामे देणार असल्याची घोषणा केली, ज्याला अनेक खासदारांनी विरोध केला.

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान!

नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. 342 सदस्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये त्यांना एकूण 174 खासदारांचा पाठिंबा मिळाला. ते इम्रान खान यांची जागा घेतील. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज शरीफ म्हणाले की, इश्वराने पाकिस्तानला वाचवले आहे. इम्रान सरकार विरोधातील अविश्वास प्रस्ताव हा एका षड्यंत्राचा भाग असल्याचे बऱ्याच दिवसांपासून सांगितले जात होते. मात्र, यात तथ्य नाही. संविधानाचे रक्षण आणि देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

शरीफ म्हणाले, 7 मार्च रोजी परदेशातून पत्र आल्याचे वारंवार सांगण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. पण अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय फार पूर्वीच घेण्यात आला होता.'

बोलताना शाहबाज शरीफ यांनी त्यांचे मोठे बंधू आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचीही आठवण काढली. ते म्हणाले की, नवाझ शरीफ यांनी मला सतत मार्गदर्शन केले. आमच्या नेतृत्वात पाकिस्तान नवी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त करत इम्रान यांच्या कार्यकाळात पाकिस्तान रसातळाला गेला. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली. त्यांच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून देशाच्या जनतेचे शोषण केल्याचा गंभीर आरोप केला.

ते पुढे म्हणाले, इम्रान सरकारने आमच्यावर आणि देशाच्या जनतेवर अत्याचार केले. सूडबुद्धीने आमच्यावर खोटे खटले दाखल करण्यात आले. मी नवा पाकिस्तान बनवणार असे खोटे आश्वासन देणा-यांनी दुष्कृत्य केले. मात्र, आमचे नवे सरकार समाजातील सर्व घटकांसाठी कार्यतत्पर असेल, असे आश्वासन शरीफ यांनी यावेळी दिले.

SCROLL FOR NEXT