Latest

Share Market Closing | शेअर बाजार अपडेट- सेन्सेक्स तेजीत, अदानींच्या स्टॉक्सला मिळाला बुस्टर डोस, गुंतवणूकदार ६ लाख कोटींनी श्रीमंत

दीपक दि. भांदिगरे

Share Market Closing : अमेरिकेतील मजबूत आर्थिक डेटा आणि अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणूकीमुळे फायनान्सियल आणि आणि माहिती तंत्रज्ञान स्टॉक्समध्ये वाढ झाली आहे. यामुळे आज सोमवारी (दि.६) भारतीय शेअर बाजारात तेजी आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) सुमारे ५५० अंकांनी वाढून ६०,३०० वर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) १६१ अंकांनी वाढून १७,७५६ च्या वर गेला. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स ६३० अंकांनी वाढला. त्यानंतर सेन्सेक्स ४१५ अंकांच्या वाढीसह ६०,२२४ वर बंद झाला. तर निफ्टी ११७ अंकांनी वाढून १७,७११ वर स्थिरावला. आज सर्व क्षेत्रात वाढ दिसून आली.

दोन दिवसांत सेन्सेक्स १,६०० अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांना फायदा

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स १,६०० अंकांनी वाढला आहे. यामुळे तो पुन्हा ६० हजारांवर झेपावला. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूह अडचणीत आला. पण एनआरआय मालकीच्या जीक्यूजी पार्टनर्स या अमेरिकन कंपनीने अदानी स्टॉक्समध्ये १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याने अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला. यामुळे अदानींचे स्टॉक्स वधारले आहेत. यामुळे शेअर बाजारात तेजी येऊन गुंतवणूकदारांना दोन दिवसांत ६.११ लाख कोटींचा फायदा झाला. यामुळे बीएसई सूचीबद्ध सर्व स्टॉक्सचे एकूण बाजार भांडवल आज २६६.१ लाख कोटी रुपयांवर गेले.

हे टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस हे टॉप गेनर्स होते. हे शेअर १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. टायटन, रिलायन्स, सन फार्मा, विप्रो आणि ॲक्सिस बँक हेदेखील वधारले. दरम्यान, टाटा स्टीलमध्ये घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात निफ्टी आयटी १.२६ टक्क्यांने वाढला. निफ्टी ऑईल आणि गॅस, निफ्टी मेटल, निफ्टी बँक यातदेखील वाढ दिसून आली.

अदानींना मोठा दिलासा, स्टॉक्समध्ये १३ टक्क्यांपर्यंत वाढ

हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाला फोटा फटका बसला. त्यांचे शेअर्स ८५ टक्क्यांपर्यंत खाली गेले. अशा स्थितीत जीक्यूजी पार्टनर्सचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष राजीव जैन अदानींसाठी तारणहार ठरले आहेत. त्यांनी १५,४४६ कोटी रुपयांचे अदानी समूहाच्या चार कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. यामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग पाचव्या सत्रांत तेजी दिसून आली आहे. राजीव जैन हे अनिवासी भारतीय (NRI) आहेत. आजच्या व्यवहारात अदानी समूहातील अदानी एंटरप्रायजेस हा शेअर निफ्टीवर टॉप गेनर होता. हा शेअर १३ टक्क्यांपर्यंत वाढला. अदानींच्या १० पैकी एनडीटीव्ही, अदानी ग्रीन, अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर आणि अदानी ट्रान्समिशन हे ६ शेअर्स ५ टक्के अप्पर सर्किट लिमिटमध्ये होते. अदानींचे उर्वरित ३ शेअर्सही ग्रीन झोनमध्ये होते. आजच्या तेजीमुळे अदानी समूहाच्या स्टॉक्सच्या बाजार भांडवलात ५० हजार कोटींची वाढ होऊन ते ९ लाख कोटींवर पोहोचले आहे.

IT स्टॉक्समध्ये तेजीचे वारे

आयटी स्टॉक्समध्ये आज १.५ टक्के वाढ झाली. त्यात इन्फोसिस (२.४३ टक्के वाढ), एमफासिस (२.५६ टक्के वाढ), Coforge (१.९८ टक्के वाढ), टाटा कन्सल्टंसी (१.३६ टक्के), विप्रो (१.३१ टक्के), एचसीएल टेक (०.५८ टक्के वाढ), टेक महिंद्रा (०.१५ टक्के वाढ) या IT स्टॉक्सचा समावेश होता.

निफ्टी ऑईल आणि गॅस स्टॉक्समध्येही वाढ

निफ्टी ऑईल आणि गॅस स्टॉक्समध्ये आज २ टक्के वाढ दिसून आली. यात महानगर गॅस (५.८१ टक्के वाढ), अदानी टोटल गॅस (५ टक्के वाढ), गेल (इंडिया ) (३.२८ टक्के वाढ), इंद्रप्रस्थ गॅस (३.०९ टक्के वाढ), ऑईल इंडिया (२.९४ टक्के वाढ), ऑईल अँड नॅचरल गॅस (२.४३ टक्के वाढ), इंडियन ऑईल कार्पोरेशन (१.४१ टक्के वाढ), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.२७ टक्के वाढ), भारत पेट्रोलियम (१.३१ टक्के वाढ) यांचा समावेश होता. (Share Market Closing)

आशियाई बाजारातही तेजी

आशियाई बाजारातही आज सकारात्मक वातावरण होते. जपानचा निक्केई १.२ टक्के वाढून तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. दक्षिण कोरियन स्टॉक्सही १ टक्क्याने वाढले. दरम्यान, चीनचा शांघाय कंपोझिट ०.२४ टक्क्याने खाली आला.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT