Latest

sharad pawar : शरद पवार यांच्यापुढे पुन्हा स्वगृही परतण्याचा पर्याय?

Arun Patil

कोल्हापूर : सख्ख्या पुतण्यानेच पक्ष फोडल्याने आणि घरच फुटल्याने बसलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि आता उर्वरित पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार अद्यापही सावरले आहेत, असे दिसून येत नाही. आपल्या राजकीय कारकिर्दीत अचानक उद्भवलेल्या कोंडीतून बाहेर कसे पडावे, हा त्यांच्यापुढचा यक्ष प्रश्न आहे. त्यांच्या देहबोलीतून ते स्पष्ट होत नसले तरी आपले बस्तान पूर्ववत बसावे आणि किमान आपल्या कन्या खा. सुप्रिया सुळे यांची भावी कारकीर्द मार्गी लागावी, हाच त्यांच्या पुढचा अजेंडा असणार. त्याद़ृष्टीने त्यांनी काही पर्यायांचा विचार सुरू केला असावा, अशी चर्चा दबक्या आवाजात आहे. त्यामध्ये आपल्या स्वगृही म्हणजे काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करावा, असाही पर्याय त्यांच्यापुढे असू शकतो, अशी कुजबूज असल्याचे बोलले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चाळीस आमदार गेले आणि उर्वरित 13 आमदार पवारांसमवेत राहिले. चार खासदारांपैकी तिघे पवारांच्या पक्षात आहेत. पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत एवढ्या अल्प संख्याबळाचे नेतृत्व करण्याची कधी वेळ आली नव्हती.

पवार ज्या महाविकास आघाडीत आहेत, त्यात आता काँग्रेस पक्ष मोठा भाऊ आहे तर त्या खालोखाल उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट आहे. त्यानंतर पवार यांच्या गटाचे स्थान आहे. त्यांचे ज्येष्ठत्व लक्षात घेऊन महाविकास आघाडीत त्यांना मानाचे पान असले तरी उद्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकांच्या जागावाटपात पवार यांच्या गटाला दुय्यम स्थान मिळण्याचीही भीती आहे. जागावाटपात काँग्रेसचेच वर्चस्व राहणार आणि मुंबईसह कोकणातील सहानुभूतीमुळे ठाकरे यांच्या गटाला त्या पट्ट्यात अधिक जागा मिळणार हे उघडच आहे. त्यामुळे पवारांच्या गटाच्या पदरी मर्यादित जागा पडतील, अशीच दाट शक्यता आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळाली आणि तळागाळातील कार्यकर्ते त्यांच्यासोबत असल्याचे चित्र पुढे आले. शरद पवारांनी पहिल्या धडाक्यात काही सभा घेतल्या. पण त्यातील काही ठिकाणी अजित पवार यांनी घेतलेल्या सभा या खूपच मोठ्या होत्या. पवार यांना त्याची जाणीव झाली नसेल, असे म्हणता येणार नाही.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यापुढे अस्तित्वाचाच प्रश्न उभा आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. स्वतंत्र पक्ष टिकवणे आणि वाढवणे हे नजीकच्या काळात अशक्यच आहे आणि राजकीय शक्ती मर्यादित असेल तर 'बार्गेनिंग पॉवर' फारशी राहात नाही, हे मुरब्बी नेतृत्वाला कळणार नाही, असे नाही. त्यामुळेच ते काही पर्यायांचा विचार करीत असावेत, असे म्हटले जाते. त्यात स्वगृही परतण्याचाही पर्याय असू शकतो. तसे झाल्यास त्यांच्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात त्यांनी अशी काही खेळी केली, तर आश्चर्य वाटायला नको.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT