नाशिक : शरद पवार यांचे आज नाशिकमध्ये आगमन झाले आहे. ते 29 व 30 जुलै रोजी नाशिक व धुळे जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. दरम्यान त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौ-यावर त्यांनी बोचरी टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौ-याविषयी विचारले असता पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कुठे दौरा करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु राज्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, लोक संकटात आहेत अशा ठिकाणी राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी दौरे काढले आहेत. स्वागतासाठी सत्कारासाठी त्यांनी कोणतेही दौरे काढलेले नाहीत. आता यातून कुणी बोध घ्यायचा की नाही हा त्याचा त्याचा प्रश्न असल्याचा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.
मुख्यमंत्री शेतक-यांच्या भेटी घेण्याऐवजी राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत यावर प्राधान्य कशाला द्यायचे हे समजले पाहिजे. सध्या संकटग्रस्त लोकांच्या भावना जाणून घेणे व पूरस्थिती असलेल्या जिल्ह्यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पण ते त्यांना योग्य वाटत आहेत तसे करत आहेत असे पवार म्हणाले.
मालेगाव जिल्हानिर्मितीच्या वादावर विचारले असता, राज्य सरकार काय निर्णय घेतय हे एक दोन दिवसांत बघू असे शरद पवार यांनी म्हटले. सरकार पडेल किंवा नाही यावर विचारले असता ते मला माहित नाही. परंतू राज्यात केव्हाही निवडणूका लागल्या तरी आम्ही तयार आहोत. असे शरद पवार यावेळी म्हणाले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते.
छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुन्हा भाष्य केले. न्यायालयाच्या निर्णयावर राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी असे छगन भुजबळ यांनी सांगितले.