Latest

देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात; पत्रकारितेवर दबाव नको म्हणत शरद पवार यांची चौफेर फटकेबाजी

अमृता चौगुले

पुणे, पुढारी ऑनलाईन : भारत देशात पुण्याचे एक वेगळे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला आणि लाल महालामध्ये त्यांचे बालपण गेले. पुणे जिल्ह्यातून त्यांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. त्यावेळी अनेक राजाचे संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जात असताना शिवरायाचे कार्य हे वेगळे होते. शिवजी महाराजांचे राज्य हे भोसल्यांचे राज्य नव्हते, तर ते रयतेचे राज्य होते, असे म्हणत पवार यांनी महाराजांच्या कार्यांची महती सांगितली.

एक ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे असलेले शरद पवार यांचे भाषण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आले. सहकारी पक्षांचा विरोध असतानाही शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

शरद पवार पुढे म्हणाले की, भारतात जवानांनी देशासाठी सर्जिकल स्ट्राइक केला, याची चर्चा आता होत आहे. मात्र, शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये ताबा घेण्याचा प्रयत्न करत या देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक केला, हे आपण विसरू शकत नाही. हिंदवी स्वराज्याचा पाया हा शिवरायांनी रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. लोकमान्य टिळकांनी स्वराजाचे आंदोलन केले. त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून इंग्रजाना घाम फोडला. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचे योगदान आम्ही विसरु शकत नाही, असेही पवार यावेळी म्हटले आहे.

पत्रकारितेवर दबाव नको

पवार म्हणाले की, देशात पत्रकारितेवर कुणाचा दबाव असता कामा नये. दबावातून पत्रकारिता ही मुक्त झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी सातत्याने पाळली. 1885 मध्ये भारतीय काँग्रेसचा जन्म झाला, त्यावेळी प्लेगच्या साथीमुळे काँग्रेसचे अधिवेशन पुण्यात न होता मुंबईत झाले होते. यामध्ये जहाल गटाचे नेतृत्व हे लोकमान्य टिळक करत होते. यावेळी त्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क म्हणाले, असे म्हणत शरद पवारांनी जोरदार फटकेबाजी केली.

टिळक पुरस्काराला वेगळे महत्त्व

लोकमान्य टिळक पुरस्काराला एक आगळे वेगळे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला पुरस्कार यापूर्वी अनेक ज्येष्ठ मान्यवरांना मिळाला आहे. आता या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश झाला. याचा आपल्याला सर्वांना आनंद आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन पवारांनी केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT