Latest

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण आले तरी जाणार नाही : शरद पवार

दिनेश चोरगे

अमरावती/मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राम मंदिर उद्घाटन समारंभाचे निमंत्रण प्राप्त झालेले नाही. ते आले तरी आपण जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी स्पष्ट केली. ते बुधवारी अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राम मंदिर उभारले ही चांगली गोष्ट आहे आणि याचा मला आनंदच आहे. मात्र, मला या उद्घाटन सोहळ्याचे कोणतेही निमंत्रण प्राप्त झालेले नाही. निमंत्रण मिळाले, तरी मी जाणार नाही. अशा धार्मिक कार्यक्रमांना मी सहसा जात नाही. माझी काही श्रद्धास्थाने आहेत. मी तिथे जातो. मात्र, त्याचे जाहीर प्रदर्शन करणे मला आवडत नाही, अशा शब्दांत त्यांनी या विषयावरील आपल्या भावना व्यक्त केल्या.
पवार म्हणाले, केंद्र सरकारकडे लोकांपुढे जाण्यासाठी ठोस स्वरूपाचा कोणताही कार्यक्रम नाही. म्हणूनच राम मंदिराच्या मुद्द्याचा वापर करून जनतेमध्ये काही वेगळे मत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 'ईडी', सीबीआय यांचा गैरवापर करून राजकारणात फायदा करून घेणे सुरू आहे, अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली.

गडकरींनी पवारांवर उधळली स्तुतिसुमने

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अमरावतीत एकाच मंचावर आले होते. विविध क्षेत्रांतील गुणवत्ताधारकांच्या पाठीशी पक्षीय अभिनिवेश न बाळगता उभे राहणारे नेतृत्व म्हणजे शरद पवार होत, अशा शब्दांत गडकरी यांनी शरद पवारांचा गौरव केला. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हे नेते एकत्र आले होते. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने जारी केलेल्या 125 रुपयांच्या विशेष नाण्याचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पवार यांना शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पाच लाख रुपये, सन्मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

SCROLL FOR NEXT