मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आता आक्रमक भूमिकेत आले आहेत. पक्षाच्या आमदार आणि खासदारांसह जिल्हाध्यक्षांची रविवारी दुपारी दोन वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महत्त्वपूर्ण बैठक त्यांनी बोलावली आहे. बंडखोरी करणारे नऊ मंत्री वगळता सर्वच आमदारांना या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे खुलासा करत राष्ट्रवादीत फूट पडलेली नसून, काही पदाधिकार्यांनी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे बैठकीला अजित पवार यांच्यासह भाजप आघाडीसोबत शपथ घेतलेले इतर आठ मंत्री वगळता इतर सर्व आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांना निमंत्रण दिले आहे.
त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहावे की नाही, असा पेच आमदार आणि खासदार यांच्यासमोर आहे. रविवारी अजित पवार यांची कोल्हापूर येथे सभा होत असताना शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे.