Latest

Shakib Al Hasan : आशिया, विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशच्या कर्णधाराची घोषणा!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shakib Al Hasan : स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याची बांगलादेश क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तो अगामी आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशचे नेतृत्व करेल. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याची शुक्रवारी घोषणा केली.

क्रिकेटच्या दोन मोठ्या स्पर्धा जवळ येत आहेत. आशिया कप 2023 या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल आणि त्यानंतर ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरू होईल. त्यासाठी संघांनी तयारी सुरू केली असून खेळाडूंच्या नावाची घोषणाही सुरू केल्या आहेत. आशिया कप स्पर्धेच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या आशियाई संघांना वर्ल्डकपची तयारी करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी एक मोठी घोषणा केली. त्यांच्या बोर्डाचे अध्यक्ष नझमुल यांनी, शकीब अल हसन हा आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशच्या वनडे संघाचा कर्णधार असेल, असे जाहीर केले.

बांगलादेशच्या वनडे संघाचा नियमित कर्णधार तमीम इक्बाल याने पाठीच्या दुखापतीमुळे 3 ऑगस्ट रोजी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुढील मोठ्या स्पर्धांसाठी संघाचा कर्णधार कोण? असा सवाल उपस्थित होत होता. दरम्यान शकिब अल हसन (Shakib Al Hasan), लिटन कुमार दास, मेहदी हसन यांचे कर्णधार पदासाठी नाव चर्चेत होते. यातून संघ व्यवस्थापनाने सर्वात अनुभवी खेळाडूला पसंती दर्शवत शाकिबकडे ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला.

शकीब चांगला अनुभव

शाकिब हसनने (Shakib Al Hasan) 2009 ते 2011 दरम्यान 49 वनडे सामन्यांमध्ये बांगलादेश संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी 22 सामन्यात विजय मिळाला होता. दरम्यान, शाकिब हा अनेकवेळा कर्णधार झाला आणि त्या पदावरून पायउतारही झाला. यामागे दुखापत हे कारण होते. त्यानंतर शाकिबने 2015 आणि 2017 मध्ये आणखी तीन वनडे सामन्यांमध्ये बांगलादेशचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली. त्याने आतापर्यंत 19 कसोटी, 39 टी-20 आणि 52 वनडे सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले.

तमिम इक्बालने माघार घेतल्याने अडचण

खरं तर, तमिम इक्बालने त्याच्या पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर बांगलादेशच्या वनडे संघाचे कर्णधारपद सोडले होते. 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठीही तो आता मैदानाबाहेर आहे, परंतु 21 सप्टेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी आणि त्यानंतरच्या वनडे वर्ल्डकपसाठी तो वेळेत तंदुरुस्त होण्याची आशा चाहत्यांना आहे. याआधीही तमिमने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला होता, त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतल्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. पण त्याने पुन्हा 3 ऑगस्टला निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना धक्का दिला. आता शाकिब हसनच्या कॅप्टन्सीखाली संघाचे प्रदर्शन कसे होते? आणि तमीम इक्बाल किती दिवसात पुनरागमन करेल? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

SCROLL FOR NEXT