ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन गेमिंग अॅपच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलांना हेरून त्यांचे धर्मांतर करणारा मुख्य सूत्रधार शाहनवाज खान मकसूद ऊर्फ बद्दो यास रविवारी दुपारी अलिबागमधून मुंब्रा पोलिसांनी अटक केली. तो अलिबागच्या एका लॉजमध्ये लपून होता. या लॉजवर छापा टाकून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्यास पुढील तपासासाठी यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली.
दरम्यान, शाहनवाजचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. या सीडीआरमधून शंभरहून अधिक अल्पवयीन मुलांचे नंबर समोर आले आहेत. तसेच शाहनवाजच्या वेगवेगळ्या 7 बँक खात्यांची देखील माहिती पोलिसांनी मिळवली आहे. शाहनवाजच्या खात्यात दर महिन्याला लाखो रुपये गुजरात, महाराष्ट्र, यूपी, दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड आदी ठिकाणांहून जमा करण्यात येत होते असे देखील स्पष्ट झाले आहे.
मुंब्रा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शाहनवाज यास रविवारी अलिबाग येथील एका लॉजमधून ताब्यात घेण्यात आले. तो आपल्या भावासोबत तेथे लपून बसला होता. त्यास सायंकाळी ठाण्यात आणण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीने त्यास अधिक चौकशीसाठी यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिस सूत्रांनी दिली.
गाजियाबादमधील कवीनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीमधील पीडित अल्पवयीन मुलगा व शाहनवाज यांची ओळख जानेवारी 2021 मध्ये फोर्ट नाईट या गेमिंग अॅप्लिकेशनवरून झाली होती. त्यानंतर गेम खेळणार्या मुलांशी शाहनवाज हळूहळू ओळख वाढवून त्यांच्याशी बोलू लागला. त्यानंतर त्याने शंभरहून अधिक मुलांचे मोबाईल नंबर मिळवले.