Latest

WPL 2023 : दिल्लीकडून गुजरातचा धुव्वा

Arun Patil

नवी मुंबई, वृत्तसंस्था : डी. वाय. पाटील स्टेडियमवर शनिवारी शेफाली वर्मा नावाचे वादळ घोंघावले. या वादळी तडाख्यात गुजरात जायंट्सचा पार पालापाचोळा होऊन तो हवेत उडून गेला. हा चुराडा शेफाली वर्माने केला, तोही अवघ्या 7 षटकात! शेफाली वर्माने (WPL 2023) 19 चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. तिने डब्ल्यूपीएल 2023 च्या हंगामातील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले.

शेफाली इथंपर्यंतच थांबली नाही तर तिने दिल्लीचा 10 विकेटस् अन् 77 चेंडू राखून पराभव केला. दिल्लीने गुजरातचे 106 धावांचे आव्हान अवघ्या 7.1 षटकात पार केले. शेफाली वर्माने एकटीने 28 चेंडूंत 76 धावा चोपल्या. त्यात 10 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी होती. शेफाली वर्माने 271.43 च्या स्ट्राईक रेटने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. सलामीवीर शेफाली वर्माला कर्णधार आणि सलामीवीर मेग लेनिंगने 15 चेंडूंत नाबाद 21 धावा करत चांगली साथ दिली.

वुमेन्स प्रीमियर लीगमधील अंतिम सामन्यात पोहोचण्याची शर्यत आता तीव्र चुरशीची बनली असून शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने गुजरात जायंट्सला हरवून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. चारपैकी चार सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स संघ पहिल्या स्थानावर असून तिसर्‍या स्थानावर युपी वॉरियर्स आहे.

तत्पूर्वी, गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिल्लीच्या मारिझाने कापच्या भेदक मार्‍यासमोर गुजरातला 20 षटकांत 9 बाद 105 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून किम ग्राथने 32 धावांची झुंजार खेळी केली. मारिझानेने 4 षटकांत 15 धावा देत 5 विकेटस् घेतल्या.

संक्षिप्त धावफलक (WPL 2023)
गुजरात जायंटस् : 20 षटकांत 9 बाद 105 धावा. (हरलीन देओल 20, किम ग्राथ 32. मारिझाने काप 5/15, शिखा पांडे 3/26.)
दिल्ली कॅपिटल्स : 7.1 षटकांत बिनबाद 107 धावा. (मेग लॅनिंग 21, शेफाली वर्मा 76.)

SCROLL FOR NEXT