Latest

कामाठीपुऱ्यातील सेक्सवर्कर मुंबईतून होणार हद्दपार

backup backup

मुंबई : चेतन ननावरे

रेड लाईट एरिया अर्थात लालबत्ती म्हणून परिचीत असलेल्या दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसर लवकरच कात टाकणार आहे. राज्य शासनाने समूह पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (क्लस्टर डेव्हलपमेंट) म्हाडा प्रशासनास नोडल एजन्सी म्हणून नेमून या परिसरातील तब्बल 800 हून अधिक जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, येथील सुमारे 2 हजार सेक्स वर्कर मुंबईतून हद्दपार होणार असून कामाठीपुराची ओळख बदलणार आहे.

कामाठीपुरा पुनर्विकास समितीचे कार्याध्यक्ष सुनिल कदम यांनी दैनिक पुढारीला सांगितले की, ब्रिटीश काळात मुंबईतील प्रमुख बांधकाम करण्यासाठी तेलंगना राज्यातील कामगार मुंबईत आले होते. त्यावेळी दलदलीचा परिसर असलेल्या कामाठीपुरा परिसरात संबंधित कामगारांसाठी वसाहत बसवण्यात आली. या वसाहतीमध्ये ब्रिटिशांनी समुद्रमार्गे येणार्‍या खलाशांसाठी मनोरंजनासाठी व्यवस्था केली होती. प्ले हाऊस म्हणून ओळखल्या जाणार्‍या या परिसराच्या नावाचा अपभ्रंश झाल्याने पुढे ते पिलाहाऊस असे ओळखले जाऊ लागले.
याचसोबत याठिकाणी अँग्लो इंडियन सेक्स वर्कर खलाशांच्या मनोरंजनासाठी होत्या.

पुढे ब्रिटिश भारतातून गेल्यानंतर अँग्लो इंडियन सेक्स वर्करची जागा कन्नड देवदासी महिलांनी घेतली. त्यानंतर पुढे नेपाळी, बांग्लादेशी महिलांसह बंगाली व बिहारी सेक्स वर्कर बाजारात कामासाठी आल्या. मात्र आता त्यांची संख्या नगण्य आहे. अवघ्या चार गल्ल्यांमध्ये हा देह विक्री व्यवसाय सुरु असतानाही संपूर्ण कामाठीपुर्‍याकडे बघण्याची नजर नकारात्मक झाली. ती आता बदलेल.

सुमारे 80 ते 100 वर्षांपूर्वीच्या 850 ते 900 इमारती कामाठीपुरा परिसरात आहेत. कामाठीपुरातील 800हून अधिक जमिन मालकांपैकी बहुतेकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या इमारतीेंचा पुनर्विकास रखडला आहे. त्याची झळ या इमारतींमध्ये राहणार्‍या सुमारे 9 हजारांहून अधिक भाडेकरुंना सहन करावी लागत आहे. म्हाडा नोडल एजन्सी म्हणून या इमारतींच्या पुनर्विकासात मोलाची भूमिका बजावणार असल्याने भाडेकरुंसह जमिन मालकांनाही आता पुनर्विकास होईल, असा विेशास वाटत आहे.

गेल्या 70 वर्षांपासून 8 बाय 10च्या खोलीत दिवस काढले आहेत. माझी आई या घरात राहत होती. आज ती हयात नाही. मी स्वतः 70 वर्षांची आहे. माझा मुलगा आणि सून याच खोलीत राहत आहेत. आज याच घरात तिसरी पिढी राहत असून सरकारने पुढाकार घेऊन लवकर हा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावून मोठे घर द्यावे. जेणेकरून मुलांचा सुखाचा संसार पाहता येईल.
– ममता जाधव,स्थानिक रहिवाशी – कामाठीपुरा

माझ्या खोलीत सेक्स वर्कर महिला राहतात. आज त्यांना उदरनिर्वाहासाठीही पैसे मिळत नाहीत. त्यामुळे भाड्याचे पैसे थकत आहे. भाड्याच्या पैशांवरच माझा उदरनिर्वाह होतो. पुनर्विकास झाल्यास येथे मोठे घर मिळेल. ते भाड्याने देत किंवा विकून चांगले पैसे आल्यास
उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल.

– शोभा राजाप्पा शिरनाक, स्थानिक रहिवाशी – कामाठीपुरा

मुंबईचे रचनाकार उपेक्षित

मुंबईतील सीएसएमटी स्थानक, जीपीओ इमारत, राजाभाई टॉवर आणि बहुतांश दगडी बांधकाम हे ब्रिटीश काळात कामाठीपुरामध्ये राहणार्‍या तेलगू बांधवांनी केलेले आहे. मात्र मुंबईच्या विकासात मोलाची भूमिका बजावणार्‍या या कामगारांचा परिसरच पुनर्विकासा पासून वंचित राहिला आहे. या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे गेल्या 100वर्षांपासून चांगल्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या रचनाकारांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा पुनर्विकास समितीचे कार्याध्यक्ष सुनिल कदम यांनी व्यक्त केली आहे.

कामाठीपुरा अत्यंत अरूंद असून, येथील प्लॉट हे 50 पासून 150 चौरस मीटर आकारापर्यंतचेच आहेत. काहीच मालकांकडे 100 हून अधिक चौरस मीटचे भूखंड आहेत. गेल्या वर्षांमध्ये अनेक इमारती पडल्या. पण आतापर्यंत फक्‍त चारच इमारतींचा पुनर्विकास होऊ शकला.

40 ते 100 चौरस फूटांच्या चिंचोळ्या खोल्यांमध्ये आजवर तीन तीन पिढ्या एकत्र नांदल्या. आजच्या पिढीला आता मोठे घर खुणावते आहे.

या क्लस्टर डेव्हलपमेंटनंतर कामाठीपुरातील प्रत्येक पात्र भाडेकरूला 508 चौरस फूट कार्पेट आकाराचे मोठे घर मिळणार आहे.

कामाठीपुरातील पात्र दुकानदारांनाही 225 चौरस फूट कार्पेट आकाराचा व्यवसायिक गाळा मिळणार आहे.

कामाठीपुरातील सुमारे 800हून अधिक जमिन मालकांना 50 चौरस मीटर क्षेत्रासाठी एक घर या प्रमाणे भरपाई मिळेल.

महत्त्वाची बाब म्हणजे या तोडग्यावर भाडेकरू, दुकानदार आणि जमिन मालकांनी एकमत दर्शवल्याने हा प्रकल्प दक्षिण मुंबईच नव्हे, तर देशातील मोठा क्लस्टर प्रकल्प म्हणून नावारुपाला येण्याची शक्यता आहे.

गेली 40 वर्षे कामाठीपुर्‍याने शरीर विक्रीचा व्यवसाय पाहिला आहे. कामाठीपुरा म्हणजे वेश्यावस्ती, असाच समज त्यातून निर्माण झाला. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. कामाठीपुर्‍याच्या काहीच भागांत ही वेश्यावस्ती होती. ती देखील आता कमी होत चालली आहे. ज्या कामाठीपुर्‍यात पूर्वी तब्बल 90 हजार वेश्या होत्या तिथे आज त्यांची संख्या जेमतेम 2 हजारांवर आली आहे. बहुतांश वेश्यांनी मुंबईबाहेर स्थलांतर करीत जवळची उपनगरे किंवा शहरे गाठली. मागे राहिलेल्या वेश्या देखील पुनर्विकासानंतर कामाठीपुर्‍यात दिसण्याची शक्यता नाही.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार गोरेगावातील मोतीलाल नगरच्या धर्तीवरच कामाठीपुर्‍याचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा ही मध्यवर्ती संस्था म्हणून काम पाहील. या प्रकल्पासाठी खासगी विकासकाची निवड म्हाडातर्फे केली जाईल. प्रकल्पातून मिळणार्‍या नफ्यात म्हाडाचा वाटा असले. महिनाभरात अधिसूचना जारी करून कामाठीपुरा आणि परिसरातील इमारतींचा व्यक्‍तिगत पुनर्विकास करण्यास मनाई केली जाईल. इथला पुनर्विकास हा क्‍लस्टर पद्धतीने व्हावा हीच सरकारची भूमिका आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT