Latest

लैंगिक शिक्षण काळाची गरज : डॉ. प्रकाश कोठारी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लैंगिक शिक्षण काळाची गरज असून, हे शिक्षण शालेय वयातच द्यायला हवे. मुला -मुलींमध्ये यौवनावस्था येण्यापूर्वीच लैंगिक शिक्षण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश कोठारी यांनी केले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशच्या 'केएमए कॉन 2023' परिषदेत ते 'लैंगिक समस्यांचे समाधान' या विषयावर बोलत होते. हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरीया हॉलमध्ये रविवारी या परिषदेचा समारोप झाला. दरम्यान, ज्येष्ठ मेंदू सर्जन डॉ. संतोष प्रभू यांना असोसिएशनने डॉ. अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. कोठारी म्हणाले, भारत लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र, लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे एड्स आजार भारतात वाढत आहे. या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण मिळवायचे असेल, तर लैंगिक शिक्षण महत्त्वाचे आहे. पूर्वी वयाच्या चौदा किंवा पंधराव्या वर्षी विवाह होत असे. तेव्हा मुला-मुलींवर प्रचंड बंधने असायची. आता विवाहाचे वय वाढले मात्र बंधने कमी झाली. पालकांनी पाल्याबरोबर मुक्त संवाद साधून त्यांनी लैंगिक शिक्षणाबाबत माहिती दिली पाहिजे. पालक अशिक्षित असतील, तर शाळांमधूनच लैंगिक शिक्षण मिळाले पाहिजे. लठ्ठपणा, व्यसन, उच्च रक्तदाब, मधुमेह यामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे लैंगिक समस्या उद्भवतात. त्यासाठी योग्य व्यायाम, सकस आहार गुणकारी ठरतो, असा सल्लाही त्यांनी दिला.

परिषदेत दिवसभरातील चर्चासत्रात डॉ. मनिष मचवे यांनी 'वैद्यकीय क्षेत्रातील कायदेशीर समस्या', डॉ. राजगोपाल यांनी 'हृदय विज्ञानमधील प्रगती', डॉ. आनंद कुलकर्णी यांनी 'मद्यपानामुळे होणारे यकृताचे आजार' या विषयांवर मार्गदर्शन केले. आरोग्यविषयक लेखनाबद्दल डॉ. निकिता जोशी, उदय गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी 'केएमए'चे अध्यक्ष डॉ.किरण दोशी, परिषदेचे अध्यक्ष डॉ. अर्जुन आडनाईक, सचिव डॉ. सूरज पवार, सहअध्यक्ष डॉ. राजेंद्र चिंचणीकर, संघटन सचिव डॉ. विनय चौगुले यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT