पुढारी ऑनलाईन डेस्क : फिनलँडची राजधानी हेलसिंकीच्या उपनगरातील वांता येथील एका प्राथमिक शाळेत मंगळवारी पहाटे गोळीबाराची घटना घडली. या घटनेत तीन मुले जखमी झाली आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एका संशयिताला नंतर पकडण्यात आले आहे, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.
व्हिएर्टोला येथील शाळेत ही घटना घडली. येथे पहिली ते नववीपर्यंत सुमारे ८०० विद्यार्थी शिकतात. तर या शाळेत ९० कर्मचारी आहेत. गोळीबारात सहभागी असलेले सर्वजण अल्पवयीन आहेत, असे पोलिसांनी सांगितले. (Finland school shooting) याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
MTV Uutiset वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आपत्कालीन सेवा, सशस्त्र पोलिस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
"तूर्त धोका टळला आहे," असे व्हिएर्टोला शाळेच्या मुख्याध्यापिका सारी लासीला यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले. या घटनेवर त्यांनी अधिक बोलणे टाळले आहे.