Latest

Stock Market Closing Bell | बजेटपूर्वी सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला, निफ्टी २१,५५० च्या खाली, नेमकं काय घडलं?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजार मंगळवारी चांगल्या सुरुवातीनंतर घसरला. आजच्या ट्रेडिंग सत्रात एकूणच अस्थिर वातावरण राहिले. सेन्सेक्स तब्बल ८०१ अंकांनी घसरून ७१,१३९ वर बंद झाला. तर निफ्टी २१५ अंकांच्या घसरणीसह २१,५२२ वर स्थिरावला. क्षेत्रीय पातळीवर रियल्टी आणि पीएसयू बँक वगळता इतर सर्व निर्देशांक लाल रंगात बंद झाले. कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, फार्मा आणि पॉवर ०.५-१ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला. (Stock Market Closing Bell)

गुंतवणूकदारांची सावध भूमिका

१ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे बेंचमार्क निर्देशांक आज १ टक्क्यांनी घसरले. पॉवर आणि एफएमसीजीमधील विक्रीचा बाजाराला फटका बसला. दरम्यान, मेटल, रियल्टी आणि ऑईल आणि गॅस शेअर्समधील खरेदीमुळे तोटा कमी झाला. मागील सत्रातील वाढीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या हेवीवेट शेअर्समध्ये आज नफावसुली दिसून आली.

केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प आणि फेडरल रिझर्व्हचा पतधोरणविषयक निर्णय हे पुढील काही दिवसात देशांतर्गत शेअर्ससाठी प्रमुख ट्रिगर असतील, असे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

१.८४ लाख कोटींचा फटका

बाजारातील घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. २९ जानेवारी रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३७७.२० लाख कोटी रुपयांवर होते. ते आज ३० जानेवारी रोजी ३७५.३६ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.८४ लाख कोटी रुपयांची घट झाली.

बजाज फायनान्सला मोठा फटका

सेन्सेक्स आज ७२ हजारांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,१०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर बजाज फायनान्सचे मोठे नुकसान झाले. हा शेअर्स तब्बल ५ टक्क्यांनी घसरून ६,८१० रुपयांवर आला. बजाज फिनसर्व्ह सुमारे २.८० टक्क्यांनी घसरून १,५९० रुपयांवर आला. टायटनचा शेअर्सही ३ टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर टॉप लूजर्समध्ये आयटीसी, रिलायन्स, अल्ट्राटेक, एनटीपीसी, रिलायन्स, सन फार्मा, एलटी हे शेअर्सही होते. तर टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय हे शेअर्स वाढले होते.

निफ्टीवर बजाज फायनान्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, एनटीपी हे टॉप लूजर्स होते. तर बीपीसीएल, टाटा मोटर्स, ग्रासीम हे शेअर्स वाढले.

LIC च्या शेअर्सने प्रथमच इश्यू प्राइसचा टप्पा ओलांडला

एलआयसी (LIC) ने आज प्रथमच त्याच्या इश्यू प्राइसचा टप्पा ओलांडला. मध्यवर्ती बँकेने एलआयसीला HDFC बँकेतील हिस्सेदारी वाढवण्यासाठी परवानगी दिल्याने हा शेअर्स वधारला आहे. एलआयसीची इश्यू प्राइस प्रति शेअर ९०२ ते ९४९ रुपयांदरम्यान होती. एलआयसीचा आयपीओ मे २०२२ मध्ये लाँच करण्यात आला होता आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर तो ८६७ रुपयांच्या इश्यू प्राइसवर सूचीबद्ध झाला होता. (LIC shares) आज हा शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ९५५ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर हा शेअर्स ९३४ रुपयांवर आला.

टाटा इन्व्हेस्टमेंटही वधारला

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा शेअर्स मंगळवारी एनएसई (NSE) वर २० टक्क्यांनी वाढून ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ५,७९४ रुपयांवर पोहोचला. ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या स्वतंत्र निव्वळ नफ्यात ६२ टक्क्यांची वार्षिक (YoY) वाढ नोंदवल्यानंतर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्सने उसळी घेतली. (Tata Investment Corporation Share Price)

आशियाई बाजारात संमिश्र वातावरण

यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतच्या निर्णयापूर्वी आशियाई शेअर बाजारात संमिश्र वातावरण राहिले. विशेषतः हाँगकाँग आणि शांघाय बाजारात घसरण पाहायला मिळाली. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक (Tokyo's Nikkei 225) २.४ टक्क्यांनी घसरून १५,६९४.६९ वर आला. टोकियोचा निक्केई २२५ निर्देशांक आणि दक्षिण कोरियामधील कोस्पी ०.१ टक्क्यांनी वाढले. (Stock Market Closing Bell)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT